४०० खाटांसाठी ३६० पदे

महाराष्ट्र टाइम्स
360 jobs approved for women and newborn hospital
बहुप्रतीक्षित महिला व नवजात शिशू रुग्णालय; तसेच माता आणि बालसंगोपन केंद्राच्या ( एमसीएच विंग ) एकूण ४०० खाटांसाठी ३६० पदनिर्मितीचा शासन आदेश बुधवारी (२४ जून) काढण्यात आला. राज्यभरात एकूण पाच हजार २२३ पदांची निर्मिती होत असून, पैकी ३६० पदे ही शहरातील दोन्ही संस्थांसाठी असणार आहेत.

महिला रुग्णालयाचे विस्तारित काम लवकर पूर्ण होऊन मनुष्यबळाची नियुक्ती झाल्यास याच वर्षी दोन्ही रुग्णालये रुग्णसेवेत येऊ शकतात, अशी एकंदरीत स्थिती आहे.
पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१ मध्ये कार्यारंभ आदेश निघालेल्या आणि मूळ बांधकाम पूर्ण होऊनही दोन वर्षे लोटलेल्या महिला रुग्णालय ाचे महत्त्वपूर्ण विस्तारित काम मात्र अद्याप बाकी आहे. उर्वरित कामांसाठी १७४ कोटींच्या निधीला अलीकडेच प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी, निधीची प्रतीक्षा कायम आहे. अर्थात, निधी प्राप्त झाला तरी हे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची स्थिती आहे. दरम्यान, दोनशे खाटांचे महिला रुग्णालय व दोनशे खाटांच्या एमसीएच विंगसाठी एकूण ३६० पदांची निर्मिती होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

साहजिकच महिला रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण होऊन, वेळेत मनुष्यबळाची नियुक्ती झाल्यास याच वर्षी दोन्ही रुग्णालये रुग्णसेवेत येऊ शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.