अकरावीतून बारावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. २०२५-२६ मध्ये अकरावीमध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी नवीन सूचना शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालय बदलासाठी उपसंचालक कार्यालयाचा प्रस्ताव महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक विभागाकडे चकरा मारत आहेत. २२ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, ती २३ जून रोजी सायंकाळपासून प्रक्रिया सुरू झाली. ऑनलाइन प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले. अकरावीतून बारावीत प्रवेश घेताना माध्यम, विषय, शाखा बदलाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अकरावीनंतर एका कनिष्ठ महाविद्यालयातून दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे सहज शक्य होणार नाही. हा बदल करण्याची सुविधा अपवादात्मकच असणार आहे. त्यासाठी बदलाचे कारण द्यावे लागेल. आणि ठोस पुराव्यानिशी उपसंचालकांद्वारे प्रस्ताव दिला जाणार आहे. विभागातील अनेक विद्यार्थी, पालक बारावीसाठी इतर कनिष्ठ महाविद्यालयाचा पर्याय शोधत असल्याचे सांगण्यात येते. बदलाबाबत अनेकजन संपर्क कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.द्यावा लागणार पुरावा; कागदपत्रेही..!
कनिष्ठ महाविद्यालय बदलाची प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. कारण नमूद करावा लागेल. आणि पुरावे अपलोड करावी लागतील. अकरावीतून बारावीमध्ये प्रवेश घेताना माध्यम, विषय, शाखा बदल करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. इतर मंडळातून, परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चितीसाठीची सुविधा उपलब्ध आहे. पालकांची बदली झाल्यास कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु, या संदर्भात पालकांच्या बदलीची कागदपत्रे जोडावे लागतील, असे अधिकारीसूत्रांनी सांगितले. या व्यतिरिक्त केवळ अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याबाबतचा ठोस पुरावा दिला तरच अशा विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदल करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक विभागाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, परभणी अशी पाच जिल्हे येतात. विभागात १४२० कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या असून ऑनलाइन प्रक्रियेशी महाविद्यालये जोडली गेल्याचे अधिकारीसूत्रांनी सांगितले.





