रस्ता दुरुस्तीसाठी ‘मजीप्रा’ला पत्र

Contributed byअधीक्षक अभियंता|महाराष्ट्र टाइम्स
रस्ता दुरुस्तीसाठी ‘मजीप्रा’ला पत्र
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत करून द्यावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला अजून एक पत्र देणार आहे. वर्षभरापासून जालना रस्त्याचे खोदकाम करून त्याची ठिगळपट्टी करण्यात आली. रस्ता ओबडधोबड झाल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. रस्त्याची दुरुस्ती न केल्याने पुन्हा एकदा पत्रप्रपंच केला जाणार आहे.

जालना रस्त्यावर उत्तर बाजूने मोंढा नाका उड्डाणपुलाखालच्या रस्त्याचे खोदकाम करून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केले. हा रस्ता महापालिका हद्दीत असूनही देखभाल, दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अखत्यारित आहे. कामाची परवानगी देताना पीडब्ल्यूडीने मजिप्राला रस्ता पूर्ववत करून देण्याची अट टाकली होती. मागच्या पावसाळ्यात काम सुरू होते. रस्ता खोदल्याने वाहनधारकांना चांगलाच त्रास होत होता. दरम्यान एका टप्प्यापर्यंत काम संपल्यानंतर त्यावर काँक्रिट अंथरण्यात आले. मात्र ते एकसंध नव्हते, ओबडधोबड रस्त्यामुळे अमरप्रीत हॉटेल ते सेंट फ्रांसिस शाळेच्या रस्त्यासमोरील टप्प्यापर्यंत दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. हा रस्ता डांबराचा आहे. त्यावर काँक्रिट अंथरल्याने अडचणी वाढल्या आहेत. रस्ता दुरुस्त करून देण्याबाबत यापूर्वी पीडब्ल्यूडीने ‘मजीप्रा’ला पत्र दिले आहेत, असे सूत्रांनी नमूद केले. रस्त्याची दुरुस्ती नेमकी कधी होणार हा प्रश्न मात्र कायम आहे.