Committee Established For Educational Autonomy Of Autonomous Colleges
स्वायत्त महाविद्यालयांबाबत समिती
Contributed by: प्र-कुलगुरू|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४८९ पर्यंत पोहचली आहे. त्यापैकी ११६ अनुदानित महाविद्यालये आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पाच महाविद्यालयांकडे शैक्षणिक स्वायत्तता आहे. स्वायत्तता घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय’, ‘देवगिरी महाविद्यालय’, ‘एम.आय.टी. महाविद्यालय’, ‘यशवंतराव चव्हाण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय’, ‘वसंतराव नाईक महाविद्यालय’ यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वायत्त महाविद्यालयांची कार्यपद्धती, नियमावली ठरविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ‘विद्यापीठ अनुदान आयोग’, ‘राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनां’मध्ये कार्यपद्धती स्पष्ट होत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात स्वायत्त महाविद्यालयांची संख्या पाच आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचा शैक्षणिक स्वायत्तता घेण्याकडे कल वाढतो आहे. दरम्यान, अशा महाविद्यालयांबाबतच्या तक्रारीही वाढत असल्याचे सांगण्यात येते. यानंतर आता स्वायत्त झालेल्या महाविद्यालयांबाबत नियमावली ठरविण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शैक्षणिक स्वायत्तता घेतलेल्या महाविद्यालयांबाबत दैनंदिन कामकाज करताना विविध अडचणी येत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कार्यपद्धती स्पष्ट होत नसल्यामुळे कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी व कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता तसेच नियमावली तयार करण्याचे काम समिती करणार आहे. ही समिती पाचही महाविद्यालयांना भेट देऊन आपला अहवाल विद्यापीठाला सादर करणार आहे.
माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. डांभारे, अधिष्ठाता डॉ. धनश्री महाजन, माजी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, डॉ. चंद्रकांत खिल्लारे, डॉ. रमेश कुंभार आदींचा समावेश आहे.