Demand For Ban On Kids World English School In Partur
परतूरच्या शाळेवर बंदीची मागणी
महाराष्ट्र टाइम्स•
परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमात वादग्रस्त गाण्यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात द्वेषभावना विकसित होत असल्याने या शाळेवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी परतूर शहरात बुधवारी मोर्चा काढण्यात आला.
आमदार संग्राम जगताप, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे व रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल लोणीकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलापासून तहसील कार्यालयापर्यंत बुधवारी मोर्चा काढण्यात आला.रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी हा प्रकार देश विरोधी असून दिशाविरुद्ध षडयंत्र रचणारी ही घटना आहे असे सांगितले. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करून शाळा बंद व्हायला हवी. हा प्रकार गावाचा विषय नाही किंवा राज्याचा नाही, तर हा देशाचा आहे असे सांगितले. शाळा असे करीत असेल, तर प्रशासन काय करते असा सवाल आमदार जगताप यांनी केला. परतूर शहरामध्ये गायींची तस्करी होत आहे, अशा घटना वाढल्याने गोवंश बंदीचे अंमलबजावणी होत नसल्याचे कीर्तनकार भंडारे यांनी सांगितले.
उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक भागवत यांनी बंदोबस्त ठेवला. हिंदू जागरण मंचाचे अंभोरे, अर्जुन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सावता काळे यांनी आभार मानले.