इतिहासाच्या गर्जनेतून उलगडली शौर्याची गाथा

महाराष्ट्र टाइम्स

नाशिककरांनी ‘काळाच्या पंजातून’ या नाटकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार अनुभवला. महाराजांची युद्धनीती, मनोबल आणि तीक्ष्ण बुद्धीचे दर्शन घडले. कटकारस्थानांवर मात करत महाराजांनी दाखवलेली कूटनीती प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी होती. या नाटकाने मराठी मातीच्या अभिमानाचा साक्षात्कार घडवला.

इतिहासाच्या गर्जनेतून उलगडली शौर्याची गाथा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

इतिहासाच्या गर्जनेतून उसळलेला शौर्याचा जयघोष, कटकारस्थानांच्या अंधारात तल्लख बुद्धीने संकटावर केलेली मात अन् क्षणोक्षणी अंगावर शहारे आणणारा थरार...असा अनुभव नाशिककरांनी अनुभवला. शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाच्या अनुभूतीतून प्रेक्षकांना मराठी मातीच्या अभिमानाचा साक्षात्कार घडवत ‘काळाच्या पंजातून’ नाटकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा पुन्हा एकदा जिवंत केला.

कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत कामगार कल्याण केंद्र विहीतगाव वसाहततर्फे ‘काळाच्या पंजातून’ हे नाटक झाले. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मंगळवारी (दि. ३) सायंकाळी सहा वाजेपासून दोन अंकांत सादर झालेल्या या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नेताजी (दादा) भोईर लिखित आणि वरुण भोईर दिग्दर्शित या नाटकातून इतिहासातील सर्वश्रुत ‘आग्र्याहून सुटका’ या प्रसंगाचा थरार नाशिककरांनी अनुभवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील कैदेतून सुटकेची ही कहाणी केवळ एक ऐतिहासिक घटना म्हणून न मांडता, महाराजांची युद्धनीती, मनोबलाची कसोटी आणि तीक्ष्ण बुद्धी यांचे प्रभावी दर्शन यानिमित्ताने प्रेक्षकांना घडले. नाटकासाठी प्रकाशयोजना कृतार्थ कन्सारा, रंगभूषा दत्ताजी जाधव, नेपथ्य किरण भोईर, वेशभूषा स्वप्नील जरीवाला, संगीत संयोजन वरुण भोईर, केशभूषा सुरेश भोईर यांनी सांभाळली.

विविध प्रसंगांनी थरारक अनुभूती

मोगल सत्तेच्या जाळ्यात अडकूनही महाराजांनी दाखवलेली कूटनीती, राजपूतांच्या मनोवृत्तीचा घेतलेला अचूक ठाव आणि शत्रूच्या राजधानीत राहूनच त्याच पहाऱ्याला सेंध लावण्याचा धाडसी निर्णय या प्रसंगांनी नाटकाचा थरार अधिक गडद होतो. प्रत्येक निर्णयामागील जोखीम तसेच मदारी व हिरोजी यांनी बजावलेली निर्णायक भूमिका कथेला अधिक धार देते. खानाने विणलेल्या कटकारस्थानांच्या जाळ्यातील एकेक धागा महाराज ज्या अचूक पद्धतीने सैल करतात, त्या क्षणी प्रेक्षकांची दाद नाटकाचा प्रभाव अधोरेखित करते.