आधारभूत दराने होणार हरभरा खरेदी

महाराष्ट्र टाइम्स

रब्बी हंगाम २०२५-२६ साठी हरभरा खरेदीची घोषणा झाली आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने हरभरा विकत घेतला जाईल. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी पाच केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया पार पडेल. प्रति क्विंटल ५ हजार ६५० रुपये दर शेतकऱ्यांना मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे.

आधारभूत दराने होणार हरभरा खरेदी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

रब्बी हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किमतीनुसार राज्यात हरभरा (चना) खरेदी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात चना खरेदीसाठी एकूण पाच केंद्रांना ‘एनसीसीएफ’कडून मान्यता देण्यात आली असून, या केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या माध्यमातून ‘एनसीसीएफ’मार्फत हरभरा खरेदी केला जाणार असून, यासाठी प्रति क्विंटल ५ हजार ६५० रुपये आधारभूत दर निश्चित करण्यात आला आहे.

हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावाजवळील खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना ऑनलाइन पिकपेरा असलेला ७/१२ उतारा, आधार कार्ड तसेच बँकेचे पासबुक सोबत आणणे बंधनकारक आहे. ही नोंदणी पाॅस मशीनद्वारे केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.