समाजमाध्यमांवर अल्पवयीनांचे ‘टोळीयुद्ध’

Contributed byराजा गायकवाडRaja.Gaikwad@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पिंपरी-चिंचवड शहरात अल्पवयीन मुलांमध्ये समाजमाध्यमांवर टोळीयुद्ध सुरू झाले आहे. भोसरी, निगडी, काळेवाडी, रहाटणी परिसरातील मुलांनी अकाउंट उघडून धमक्यांचे व्हिडिओ टाकले आहेत. अभ्यासाच्या वयात ही मुले भाईगिरीचे धडे गिरवत आहेत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे वर्तन वाढत आहे. पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेवावे. शाळांनी डिजिटल साक्षरतेबाबत जनजागृती करावी. सायबर पोलिसांनी कारवाई करावी.

growing group fights among teenagers on social media

पिंपरी : वय अवघे आठ ते दहा... मात्र, तोंडात शिव्या, चेहऱ्यावर भयानक हावभाव आणि हातात सायकल-दुचाकी घेऊन ‘आमचा नाद कराल, तर थेट कार्यक्रम,’ अशा उघड धमक्या...

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, निगडी, काळेवाडी, रहाटणी आदी परिसरांच्या नावाने समाजमाध्यमांवर अकाउंट उघडून अल्पवयीन मुलांनी रील्सद्वारे सुरू केलेले हे तथाकथित ‘टोळीयुद्ध’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

गेल्या काही दिवसांत विविध परिसरांच्या नावाने उघडलेल्या अकाउंटवरून ‘आम्ही भोसरीवाले’, ‘हवा फक्त निगडीवाल्यांची’, ‘खरे डॉन आम्हीच’ अशा संवादांसह शिव्यांची सरबत्ती पाहायला मिळते. एका व्हिडिओत किमान १० ते १५ मुले सायकलवर, दुचाकीवर स्टंटसदृश हालचाली करून धमक्या देतात.

ज्या वयात अभ्यास, खेळ आणि शाळेचे शिक्षण महत्त्वाचे असते, त्या वयात ही मुले ‘भाईगिरी’चे धडे गिरवत आहेत. समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीची लालसा, मोठ्यांचे अनुकरण आणि समवयस्कांचा दबाव यामुळे असे वर्तन वाढीस लागते. ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ मिळवण्याच्या नादात ही मुले काय बोलत आहेत, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव त्यांना नाही. या आभासी धमक्यांचे प्रत्यक्ष भांडणांत रुपांतर होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. यावर उपाय म्हणून पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर नियंत्रण ठेवणे, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तयार केले जातात, पाहिले जातात यावर लक्ष देणे आणि मुलांशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक आहे. शाळांनी डिजिटल साक्षरतेबाबत जनजागृती करणे गरजेचे ठरते; तसेच सायबर पोलिसांनीही अशा अकाउंट्सवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत.