सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे धुळवडनिमित्त रंग खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सागर गहाणे (वय १६) व प्रणय गहाणे (वय १३) असे मृतकांचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मंगळवारी गावामध्ये धुळवड असल्याने आनंदाचे वातावरण होते. सकाळच्या सुमारास गावातील पुरुष, महिला, मुले यांनी एकमेकांवर प्रेमाने रंगीबेरंगी रंगाचा वर्षाव केला. रंग खेळता खेळता दुपार झाली. सागर व प्रणव यांनी गावातील तलावात आंघोळ करावी असा बेत केला. दुपारच्या सुमारास दोघेही तलावात आंघोळीला गेले. आंघोळ करताना तलावातील पाण्याचा अंदाज चुकला आणि दोघेही पाण्यात बुडाले.
ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती डुग्गीपार पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटने प्रकरणी आकस्मात गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.






