तालुक्यातील वणी येथे अल्पवयीन मुलीचा छळ झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संशयिताचा शोध सुरू आहे.
फेब्रुवारी २०२५ ते १ मार्च २०२६ या कालावधीत संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित मुलीशी ओळख वाढवली. त्यानंतर भावनिक दबाव, धमक्या व ब्लॅकमेल करून वारंवार भेटीसाठी बोलावल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये मंदिर परिसरातून मुलीला कारमध्ये बसवून वणी-फोफशी रोडवरील निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे धमकी देत व मारहाण करीत तिच्या संमतीशिवाय अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर बदनामी व कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देत तिला गप्प राहण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या छळामुळे मुलगी मानसिक तणावाखाली गेल्याची माहिती असून, तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. भीतीमुळे कुटुंबीयांनी तिचे शिक्षण थांबवून नाशिक येथे स्थलांतर केल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्रास सुरू असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संशयिताने पीडितेच्या आईशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
लव्ह जिहादचा प्रकार?
हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी संशयिताला सावध केल्याची शक्यता असून, पोलिस ठाण्यातील गोपनीय माहिती संशयितापर्यंत कशी पोहोचली, याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती केदार यांनी दिल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.






