पश्चिम आशियात इराण, इराक आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार , जलमार्ग, विमा प्रीमियम आणि पेमेंट व्यवहारांमध्ये मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील द्राक्ष, कांदा, बेदाणे, डाळिंब व भाजीपाला निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे सविस्तर निवेदन पाठवून तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कृषी निर्यात राज्य असून, नाशिक, लासलगाव, पिंपळगाव परिसरातील लाखो शेतकरी या निर्यातीवर अवलंबून आहेत. समुद्री मार्गांवरील तणावामुळे जहाजवाहतुकीत विलंब, वाहतूक खर्च व विमा दर वाढ, तसेच ताज्या उत्पादनांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. निर्यातीत अडथळे आल्यास स्थानिक बाजारात पुरवठा वाढून दर घसरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो.
द्राक्ष, कांदा, बेदाणे व भाजीपाला यासाठी विशेष निर्यात प्रोत्साहन पॅकेज जाहीर करावे, शेतकरी व निर्यातदारांसाठी व्याज सवलत व कर्ज पुनर्रचना योजना लागू करावी, निर्यातदारांसाठी क्रेडिट गॅरंटी व विमा संरक्षण अधिक सक्षम करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.






