बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलॅरियम उभारण्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव विभागाने शासनाकडे सादर केला असून या प्रकल्पासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यामुळे बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलॅरियम उभारणीची ही महत्त्वपूर्ण मागणी प्रत्यक्षात उतरून चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन, संशोधन आणि आर्थिक विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारशाचे जतन, संशोधन, जनजागृतीसाठी ‘टिंबर म्युझियम व झायलॅरियम’ उभारणार आहे. त्यामुळे हे म्युझियम आणि झायलॅरियम ( काष्ठसंग्रहालय ) पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल, शिवाय लाकूडशास्त्र, वनसंपदा आणि पर्यावरण अभ्यासाकरिता नव्या पिढीसाठी महत्त्वाचे संशोधन व अभ्यासकेंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलॅरियम स्थापन करण्याची मागणी सभागृहात मांडली होती. या चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत हे म्युझियम उभारले जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले होते. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीवर जणू शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त होत असताना राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री या प्रकल्पाबाबत घोषणा करतील का, याकडे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुनगंटीवारांच्या पत्रावर प्रत्यक्ष भेटीत सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले होते, त्यामुळे याबाबतची रूपरेषा स्पष्ट झाली. आता अर्थसंकल्पातील घोषणेने तो मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परंपरा आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर, नवी दिल्लीतील नवीन संसद भवन, भारत मंडप, पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय सचिवालय अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूंमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सागवानाचा वापर करण्यात आला. या परिसरातील सागवानाला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असून त्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलॅरियम उभारण्यात येत आहे.





