शहरात शुक्रवारी दिवसभरात या हंगामातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस कमाल, तर १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शहरात सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत गेली आणि दुपारी रस्त्यांवरून फिरताना चटके बसत होते. शहराबरोबरच जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा जाणवला.
तापमानातील प्रतिकूल घडामोडींमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ झाली आहे. पुढील चार दिवसांत तापमानात आणि उन्हाच्या तीव्रतेत वाढ होणार आहे. पुण्यात पारा ३९ अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातवर सध्या जास्त दाबाची (अँटी सायक्लोनिक) स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे सध्या कोरडे हवामान असून, तापमान वाढले आहे. किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त नोंदविण्यात येते आहे. परिणामी, शुक्रवारी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पारा ४० अंशांच्या पुढे गेला. राज्यातील उच्चांकी तापमान ४०.७ अंश सेल्सिअस अमरावतीमध्ये, तर नीचांकी तापमान १४.७ अहिल्यानगरमध्ये नोंदविण्यात आले.
शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : शिवाजीनगर ३६.८, बालेवाडी ३६.३, चिंचवड ३६.१, वडगाव शेरी ३५.७, हडपसर ३५.५, पाषाण ३५.४, हवेली ३४.८, आंबेगाव ३४.२





