जुन्नरचे बिबटे होणार ‘वनतारा’चे पाहुणे

महाराष्ट्र टाइम्स

जुन्नरचे २० बिबटे आता गुजरातच्या जामनगर येथील 'वनतारा' प्रकल्पात स्थलांतरित होणार आहेत. या बिबट्यांसाठी विशेष ॲम्ब्युलन्स जुन्नरमध्ये दाखल झाल्या आहेत. शनिवारी सकाळी या बिबट्यांचे स्थलांतर सुरू होईल. तज्ज्ञांचे पथक या बिबट्यांची काळजी घेईल. 'वनतारा' हे जगातील सर्वात मोठे प्राणी पुनर्वसन केंद्र आहे.

जुन्नरचे बिबटे होणार ‘वनतारा’चे पाहुणे
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘वनतारा’मध्ये देशातील विविध भाग जुन्नर, हिमाचल प्रदेश, गोरेवाडा, गुजरात आणि जुनागड येथून स्थलांतरित केलेले बिबटे ठेवण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी ३१ जुलैला माणिकडोह बिबट निवारा केंद्रातून दहा बिबटे ‘वनतारा’त स्थलांतरित करण्यात आले होते. सध्या तिथे अशा बिबट्यांची संख्या २४० आहे. आता जुन्नरचे २० बिबटे तेथे पोहचल्यानंतर ही संख्या २६० होणार आहे.

राज्यातील बिबट्यांच्या उपद्रवाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न बनलेल्या जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रातून जेरबंद करण्यात आलेले २० बिबटे गुजरातच्या जामनगरमधील ‘वनतारा’ प्रकल्पात स्थलांतरित करण्यास प्रशासन सज्ज झाले आहे.

जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या वनतारा प्राणीसंग्रहालय जामनगर (गुजरात) येथे माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्रातून ५० बिबटे स्थलांतरीत करण्याचा निर्णय बिबट्यांच्या मानवी हल्ल्यांच्या सलग झालेल्या घटनांनंतर प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्याची कार्यवाही होत असून, परवानगी मिळालेल्या ५० पैकी २० बिबटे पहिल्या टप्प्यात स्थलांतरित होत आहेत. त्यामध्ये १० नर बिबटे आणि १० मादी बिबटे असणार आहेत. या महाकाय ॲम्ब्युलन्स पाच मार्चला जुन्नरमध्ये येण्यासाठी निद्याल्या आहेत. शनिवारी (सात मार्चला) सकाळी निवारा केंद्रातून बिबट्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. बिबट्यांच्या स्थलांतरासाठी काही पशुवैद्यकीय अधिकारी; तसेच तज्ज्ञांचे पथक या ॲम्ब्युलन्ससोबत येत असून, प्रवासादरम्यान या टीमकडून बिबट्यांची बडदास्त ठेवण्यात येणार आहे.

या ॲम्ब्युलन्स हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलले जाणाऱ्या असून, बिबट्यांना घेऊन या ॲम्ब्युलन्स लांबचा प्रवास करणार आहेत. त्यामुळे त्यामध्ये कोणताही बिघाड किंवा अडचणी आल्या, तर त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ‘ब्रेकडाउन व्हॅन’देखील या ॲम्ब्युलन्सच्या ताफ्याच्या दिमतीला आहे. दरम्यान, प्रस्थानापूर्वी स्थलांतरित करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नेले जाईल. त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना होणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

बिबट्या तेथे पोहचल्यानंतर तीन वेगवेगळ्या टप्प्यांत ठेवला जातो. अगोदर त्याला क्वारंटाइन पिंजऱ्यात ठेवले जाते. त्यानंतर ‘सॉफ्ट केज’मध्ये ठेवले जाते. नंतर त्याला मुख्य पिंजऱ्यात हलविण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्याच्या दृष्टीने हे टप्पे अवलंबले जात असल्याने बिबट्यांच्या स्थलांतराची ही प्रक्रियादेखील वेळखाऊ ठरते, असे यातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.