जिल्ह्यात आजपासून मंडळ स्तरावर शिबिरे

महाराष्ट्र टाइम्स

महसूल विभागाने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' सुरू केले आहे. या अंतर्गत मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित केली जातील. १५ महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी मिळतील. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी १४ ते १५ वर्षांतील मुलींना एचपीव्ही लस मोफत दिली जाईल. ही मोहीम ९ मार्चपासून सुरू होणार आहे.

district level camps and hpv vaccination drive launched

राज्यभरातील सामान्य जनतेला शासकीय सेवांचा लाभ त्वरित मिळावा, यासाठी महसूल विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आज, शनिवारपासून मंडळ स्तरावर शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

हे अभियान तीन टप्प्यांत राबवले जाणार आहे. महसूल विभागाशी संबंधित १५ महत्त्वाच्या सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये दाखले, उतारे आणि इतर शासकीय योजनांसाठीची पायपीट थांबेल. तालुक्यातील दोन महसूल मंडळांसाठी ७ मार्च आणि १४ मार्च (शनिवार) रोजी शिबिरे होतील. तालुक्यातील दुसऱ्या दोन मंडळांसाठी १० एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी आयोजन केले जाईल. नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर ८ मे आणि १५ मे (शुक्रवार) रोजी दोन शिबिरे पार पडतील.अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यात एकूण ६ शिबिरांच्या माध्यमातून महसूल प्रशासन जनतेच्या दारी पोहोचणार आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) रोखण्यासाठी १४ वर्षे पूर्ण ते १५ वर्षांआतील मुलींची एचपीव्ही लसीकरण मोहीम ९ मार्चपासून जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. ही लस एकाच डोसच्या स्वरूपात मोफत देण्यात येणार असून, या मोहिमेमुळे लाखो मुलींना भविष्यातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. या लसीकरणासाठी पालकांची संमती बंधनकारक असेल. ही लस अत्यंत सुरक्षित असून कुठलेही गैरसमज बाळगू नयेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.