राज्यातील १ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिटच्या रस्त्यांनी जोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. त्याकरिता आशियाई बँकेच्या साह्याने ४ हजार ५०० कोटी रुपये खर्चाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तर ठाणे ते लातूरपर्यंत ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
'महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना २०२५ ते २०४७ अंतर्गत अमृतकाल राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. या योजनेत ६ हजार २७२ रस्ते विकास योजना किलोमीटरचे द्रुतगती मार्ग आणि १४ हजार ९१९ किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच ४ हजार २४७ किलोमीटरचे 'पर्यटन परिपथ ' समाविष्ट आहेत. ही योजना महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्त्वाची असेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नागपूर-गोंदिया, भंडारा- गडचिरोली, नागपूर-समृद्धी चंद्रपूर या प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या कामास मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तर वाढवण बंदरालादेखील समृद्धी महामार्गाने जोडण्यासाठी तवा ते भरवीर माल वाहतूक कॉरिडोरच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. त्याशिवाय पुणे ते शिरुर हे ५३ किलोमीटर लांबीचे ७ हजार ५१४ कोटी रुपये शिरूर उन्नत मार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. तर तळेगाव-चाकण हा ६ हजार ४९९ कोटी रुपये किंमतीचा २५ किलोमीटर चाकण लांबीचा उन्नतमार्ग हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.





