सामनावीर संदीप गाणारच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर देशोन्नतीने स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे (एसजेएएन) आयोजित २६व्या आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात लोकसत्तावर ३९ धावांनी विजय मिळविला.
धनवटे नॅशनल कॉलेजच्या वसंतनगर मैदानावर झालेल्या सामन्यात देशोन्नतीने २० षट्कांत सर्वबाद १५३ धावा केल्या. गाणारने ५६ धावा (४८ चेंडू, ७ चौकार) केल्या. तर सतीश कांचनकरने २१ आणि कार्तिक व सम्राट गोटेकरने प्रत्येकी १२ धावांचे योगदान दिले. राजेश्वर ठाकरे व विनोद परतेकीने प्रत्येकी तीन आणि मनोज चंदनखेडेने दोन गडी बाद केले.
लोकसत्ताचा संघ १६.२ षटकांमध्ये केवळ ११४ धावांपर्यंत मजल मारू शकला. धनंजय खेडकरने सर्वाधिक ५४ धावा (३६ चेंडू, २ चौकार, ५ षट्कार) केल्या. देशोन्नतीच्या कार्तिक, अभि, सम्राट व शुभम बोरघरेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. क्रीडा संघटक देवेन दस्तुरे यांच्या हस्ते गाणारला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आज, शनिवारी स्पर्धेत दैनिक सकाळ आणि लोकमत यांच्यात सामना खेळला जाणार आहे.





