पंडित डाके महाराज यांच्या पुढाकाराने ५ मार्च २०२४ रोजी सेलू तालुक्यातील बोथ येथून फिरता ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात झाली होती. सांगता सोहळ्यात सेलू, मानवत तालुक्यातील १८२ गावांतील तसेच राज्यभरातील २५ हजार भाविक ज्ञानेश्वरी पारायण करणार आहेत. दररोज १० ते १२ गावांमधून जेवणासाठी गोड पदार्थांची सोय केली जाणार आहे. शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील नागरिक तसेच ज्ञानेश्वर प्रचारकांचा आणि शेकडो भाविकांचा सोहळ्यातील विविध सेवेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सेलू तालुक्यातील ८७ गावात झालेल्या फिरता ज्ञानेश्वरी पारायणाचा सांगता सोहळा सेलू येथील सातोना रोडवरील अलंकापुरी (मयुरी पार्क) भागात ११ मार्च ते १९ मार्च २०२६ या काळात होत आहे. या सोहळ्याचे आयोजन सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, परतूर आणि मंठा तालुक्यातील भाविकांनी केले आहे. मंडप उभारणीसह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने १२ एकर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी महापारायण सोहळा होत आहे. अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून १२ मार्चपासून श्री महाभारत संदेश कथा तसेच नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक पंडित महाराज डाके असून, कथेचे यजमान जयप्रकाश विजयकुमार बिहाणी आहेत. या सोहळ्यात पालकमंत्री तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंडप सौजन्य दिले असून, दररोजच्या महाप्रसादाची सेवा सेलू शहर व परिसरातील भाविकांनी घेतली आहे. तर आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चर्सचे रामप्रसाद घोडके यांच्या महाप्रसाद सेवेने सांगता होणार आहे. नगराध्यक्ष मिलिंद, सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व नगर परिषद टीम पाणी आणि स्वच्छतेसाठी, तर सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सहकार्य करत आहे. या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात ११ मार्च रोजी ग्रंथदिंडीने होणार आहे. विशेष म्हणजे आळंदी येथून हेलिकॉप्टरमधून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीचे आगमन आणि ग्रंथदिंडीवर पुष्पवृष्टी केली जाईल. सोहळ्यात नामदेव महाराज चारठाणकर, अनिल महाराज पाटील, मधुसूदन महाराज दैठणकर, बंडा तात्या कराडकर, स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज, ज्ञानेश्वर माउली कदम (मोठे), सोपान महाराज सानप, उमेश महाराज दशरथे, पुरुषोत्तम महाराज पाटील, महादेव महाराज राऊत, विशाल महाराज खोले, संजय महाराज पाचपोर, अच्युत महाराज दस्तापूरकर आणि नामदेव महाराज शास्त्री या दिग्गज कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे. १८ मार्च रोजी ज्ञानेश्वर माउली कदम (छोटे) यांचे विशेष प्रवचन होईल, तर १९ मार्च रोजी त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.





