गाडगेबाबांच्या तिन्ही ‘भूमी’ एकसूत्रात

महाराष्ट्र टाइम्स

संत गाडगेबाबांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी शेंडगाव, कर्मभूमी ऋणमोचन आणि निर्वाणभूमी वलगाव यांना जोडणारे तीर्थक्षेत्र सर्किट विकसित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे. या सर्किटमुळे गाडगेबाबांच्या तिन्ही प्रमुख स्थळांचा एकात्मिक विकास साधला जाईल. रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. यामुळे गाडगेबाबांचा विचार आणि वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

गाडगेबाबांच्या तिन्ही ‘भूमी’ एकसूत्रात
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

संत गाडगेबाबा यांच्या १५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या जन्मभूमी, कर्मभूमी आणि निर्वाणभूमींना जोडून तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. या माध्यमातून गाडगेबाबांशी निगडीत तिन्ही क्षेत्रे एकसूत्रात गुंफली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात जाहीर केले. या तरतुदीमुळे शेंडगाव, ऋणमोचन आणि वलगावच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गाडगेबाबा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त २३ फेब्रुवारीला ‘मटा’ने गाडगेबाबांच्या स्मृतिस्थळांची दुरवस्था आणि रखडलेल्या निधीचा मुद्दा मांडला होता. त्याची दखल यानिमित्ताने राज्य सरकारने घेतली आहे.

आतापर्यंत गाडगेबाबांशी संबंधित स्थळांचा विकास हा तुकड्या-तुकड्याने किंवा स्वतंत्र प्रकल्पांच्या माध्यमातून होत होता. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्याने अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेंडगाव (जन्मभूमी), भातकुली तालुक्यातील ऋणमोचन (कर्मभूमी) आणि अमरावतीजवळील वलगाव (निर्वाणभूमी) या प्रमुख स्थळांना ‘तीर्थपर्यटन परिक्रमा’ संकल्पनेतून एकत्र जोडले जाणार आहे. त्यात गाडगेबाबांची समाधी असलेल्या अमरावती शहरातील समाधी मंदिराचा समावेशही करण्यात येणार आहे. गाडगेबाबांच्या आयुष्याचा खडतर प्रवास आणि त्यांनी दिलेला समाजप्रबोधनाचा वारसा या सर्व स्थळांमधून उलगडत असल्याने, त्यांना एकात्मिक विकास आराखड्याने जोडण्याचा प्रयत्न शासनाच्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

गाडगेबाबांच्या जयंतीदिनी ‘मटा’ने शेंडगाव येथे १८.५९ कोटी रुपयांच्या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सभागृह, भक्तनिवास, स्मृतिकेंद्र, अस्थी भवन आणि पुतळा परिसराचे सुशोभीकरण यासारखी कामे मार्गी लागल्याचे स्पष्ट केले होते. सोबतच गावातील रस्ते आणि पाणीप्रश्नाकडेही लक्ष वेधले होते. गावकऱ्यांच्या मनातील विकासाची आस मांडली होती. दुसरीकडे गाडगेबाबांची कर्मभूमी मानल्या जाणाऱ्या ऋणमोचन आणि वलगाव येथील निर्वाणभूमीच्या विकासाचा ३७.८६ कोटी रुपयांचा आराखडा प्रारंभिक टप्प्यात अडकला असल्याचे वास्तवही दाखविले होते. या प्रकल्पासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात केवळ १.२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर २०२५-२६साठी ५० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. एकूण मंजूर आराखड्याच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४.५ टक्के निधी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्ष कामांची गती अत्यंत मर्यादित आहे. या आराखड्यात सभामंडप, सुसज्ज दर्शन मार्ग, अंतर्गत रस्ते, आधुनिक प्रकाशयोजना, स्वच्छता सुविधा आणि पर्यटकांसाठी मूलभूत सोयी प्रस्तावित आहेत. आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या धोरणामुळे या रखडलेल्या विकासकामांना नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

अर्थसंकल्पातील या तरतुदीमुळे गाडगेबाबांच्या स्मृतिस्थळांचा विकास केवळ स्वतंत्र प्रकल्पांपुरता मर्यादित न राहता, परस्परांशी जोडलेल्या पर्यटन परिक्रमेच्या स्वरूपात होणार आहे. पुढील टप्प्यात प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण वेळेत झाल्यास शेंडगाव, ऋणमोचन आणि वलगाव ही स्थळे महाराष्ट्राच्या तीर्थपर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उमटतील. स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांच्या शेंडगावातील जन्मापासून ऋणमोचनच्या कर्मभूमी आणि वलगावातील निर्वाणापर्यंतचा त्यांचा प्रवास समाजजागृतीचा एक प्रेरणादायी अध्याय आहे. या तीर्थपर्यटन परिक्रमेच्या माध्यमातून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत अधिक सक्षमपणे पोहचविणे शक्य होणार असल्याचा आशावादही यानिमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे.

गाडगेबाबा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जन्मभूमी, कर्मभूमी आणि निर्वाणभूमीचे वास्तवदर्शी चित्र मांडले होते. त्याची दखल अर्थसंकल्पातील तरतुदीच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. या तीर्थक्षेत्र सर्किटच्या माध्यमातून गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपला जाणार आहे.