राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणाच्या तपासात ‘सीआयडी’कडून वेळकाढूपणा होत असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत सातत्याने टाळाटाळ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीआयडी कार्यालयात दुसऱ्यांदा जबाब नोंदवल्यानंतर रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, ‘आमच्याकडील माहिती आणि ‘एआयबी’च्या अहवालातील त्रुटींचा अभ्यास करून पुन्हा निवेदन दिले आहे. यापूर्वी अहवाल आल्यानंतर एफआयआर नोंदवू असे सांगण्यात आले होते. मात्र, आता ‘एआयबी’चा अंतिम अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करू असे सांगितले जात आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले, ‘सन २०२३मध्ये याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. मात्र, त्याचाही अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे.’
कलम १८० अंतर्गत पुन्हा निवेदन
‘यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी कलम १८० अंतर्गत सीआयडीकडे जबाब नोंदवला होता. गेल्या दहा दिवसांत मिळालेल्या माहितीच्या आधारे आज पुन्हा निवेदन दिले आहे. डीजीसीएचा अहवाल उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी तो अद्याप सीआयडीपर्यंत पोहोचलेला नाही,’ असा दावा रोहित पवार यांनी केला.
दिल्लीमध्ये आघाडीच्या नेत्यांची भेट
या प्रकरणाची संसदेत चर्चा व्हावी यासाठी दिल्लीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांच्यासह आघाडीतील पदाधिकाऱ्यांना भेटून हा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांचीही भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली; तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेशकुमार आणि तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वालाही भेटण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
‘व्हीएसआर’ कंपनीचे मालक व्ही. के. सिंग गुरुवारी (पाच मार्च) चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात आले होते. त्या वेळी त्यांच्या सुरक्षा पथकाकडे एके-४७ रायफल होती, असा दावा रोहित पवार यांनी केला. सीआयडी कार्यालयात त्यांना विशेष वागणूक दिली. सिंग यांची कार सुरक्षा व्यवस्थेसह थेट गेटमधून आत सोडण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी नाश्ता व चहापानाची सोयही करण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला.





