शिवछत्रपतींना अभिवादन

महाराष्ट्र टाइम्स

छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती शहरात उत्साहात साजरी झाली. शिवभक्तांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. पारंपरिक वेशभूषा आणि भगवे ध्वज घेऊन नागरिक सहभागी झाले. शौर्यगाथा सांगणारे पोवाडे आणि व्याख्यानांमधून महाराजांना अभिवादन करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांनी अनोख्या उपक्रमातून मानवंदना दिली. गडांवरून शिवज्योत आणण्यात आली. शिवपालखी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवछत्रपतींना अभिवादन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आणि मिरवणुकांचे आयोजन करून शिवभक्तांनी शहराच्या विविध भागांत शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आलेली जयंती जल्लोषात साजरी केली. शहरात सकाळपासूनच ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषा आणि हाती भगवे ध्वज घेऊन यात सहभागी झाले. शौर्यगाथा उलडगणारे पोवाडे, व्याख्याने आणि विविध कार्यक्रमांतून शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात आले.

शहरात रात्री उशीरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी वैविध्यपूर्ण उपक्रमातून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सिंहगड, पुरंदर, राजगड, तोरणा या गडांवरून शिवभक्तींनी शिवज्योत आणली. दर वर्षीप्रमाणे ‘श्री शिवजयंती उत्सव समिती’तर्फे शिवपालखी सोहळा उत्साहात झाला. भवानी पेठेतील भवानीमाता मंदिरापासून या सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीपुढे पारंपरिक ढोल पथक, बँड, गोंधळी, मर्दानी खेळ याचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठा, मातंग, वडार, तिल्लोरी कुणबी, नाभिक यांसह विविध समाजांचे अभिवादन रथ सहभागी झाले होते. बुरुड समाजाने सादर केलेला भारतीय नौदलाच्या रथाने सर्वांचे लक्ष वेधले. वडार समाजाच्या वीस फुटी हनुमान रथ व कुस्तीचा देखावा साकारला. लोकेश कोंढरे, किरण शिंदे, ओंकार घोलप, अनिरुद्ध बनसोड यांनी हा सोहळा आयोजित केला होता.

शिवसेना वडगाव शेरी विधानसभेतर्फे स्वच्छता कर्मचारी महिलांना गौरविण्यात आले. या वेळी चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी नीलेश बडाख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते. राष्ट्रवादी कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे अध्यक्ष नरेश जाधव यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शब्बीर शेख, गुलशन शेख, अनिल अग्रवाल, हरीश लडकत उपस्थित होते. एकता सेवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्ष प्रभाग २१ तर्फे गुलटेकडी येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बाळासाहेब शेलार, नझीर शेख, ईश्वर वायाळ उपस्थित होते. दलित सेनेच्या ताडीवाला रस्ता येथील कार्यक्रमाला सुनील यादव, वसंत बोले, काळूराम ससाणे, शशिकांत शेलार उपस्थित होते.

जुन्नर : शिवनेरी स्मारक समिती आणि जुन्नर शहर शिवजयंती उत्सव सोहळा समिती यांच्यातर्फे शिवनेरी गडावर तिथीप्रमाणे शिवजयंती सोहळा जल्लोषात साजरा झाला. खासदार मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे पुढे नेत असताना देशाला हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी सर्वांनी त्यांना साथ द्यायला हवी,’ असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. शिवव्याख्याते सुधीर गाडे, जुन्नरच्या नगराध्यक्ष सुजाता काजळे, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंतराजे मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे, समन्वयक रमेश कर्पे, सज्जनगड च्या समर्थ सेवा मंडळाचे प्रवीण कुलकर्णी यांच्यासह शिवभक्तांच्या गर्दीत हा सोहळा साजरा झाला.