काँग्रेसने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध ज्या पद्धतीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे, त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप होईल असा हल्लाबोल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी चढविला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना ते म्हणाले की लोकसभा अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू होत आहे हे दुर्दैवी आहे.
बिर्ला यांच्याविरुध्दच्या अविश्वास प्रस्तावावरील १० तासांच्या चर्चेला मंगळवारी सुरुवात झाली. आज, बुधवारी या प्रस्तावावर मतदान होईल. चर्चेच्या पहिल्या दिवशी सत्तारूढ सदस्य व विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमकी झडल्या. चर्चेच्या सुरुवातीलाच एमआयएमचे असदुद्दिन ओवैसी व तृणमूल काँग्रेसचे सौगत राॅय यांनी पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेबद्दल आक्षेप घेतला. बिर्लांविरुद्ध काँग्रेसने आणलेल्या व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेल्या या अविश्वास प्रस्तावात ‘पक्षपाती वर्तन’, विरोधी पक्षाचा आवाज दाबणे आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलण्याची संधी नाकारणे या मुख्य आरोपांचा समावेश आहे.







