ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना शिधावाटप दुकानातून दरमहा १२ सॅनिटरी पॅड विनामूल्य देण्याचे आदेश शहापूरच्या तहसीलदारांनी ठाणे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ग्रामीण भागातील गोरगरीब महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मासिक काळात स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक सॅनिटरी पॅड खरेदी करणे त्यांना परवडत नाही. या महिलांना शिधावाटप दुकाने आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत,या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी शहापूरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाची दखल घेत हा आदेश दिला आहे.
श्रमजीवी संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी, शहापूर तालुका महिला प्रमुख दर्शना आगिवले, उपाध्यक्ष मनीषा खोडका आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. श्रमजीवी संघटनेच्या माजी कार्याध्यक्षा आणि वसई विधानसभा सदस्य स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत हा प्रश्न उपस्थित केला होता.







