प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत घेऊन मुंबईमध्ये अवघ्या पाच दिवसांच्या बाळावर हृदयविकारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडीए ( पेटंट डक्टस आर्टेरिओसस ) स्टेंटिंगद्वारे हृदयदोष असलेल्या पाच दिवसांच्या नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात आले. या बाळाचे वजन साडेतीन किलोपेक्षाही कमी होते. फुप्फुसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने गंभीर सायनोटिक जन्मजात हृदयविकार असण्याची शक्यता होती.
सखोल वैद्यकीय चाचणीनंतर या बाळाला फुप्फुसाचा आजार असल्याचे आढळले. या वैद्यकीय स्थितीमध्ये हृदयाच्या उजव्या बाजूला आणि फुप्फुसांना जोडणारी सामान्य धमनी नसते. कार्डियाक टीमने ही गुंतागुंतीची प्रक्रिया सहजरित्या केली. त्वरित वैद्यकीय मदतीमुळे बाळाचे प्राण वाचवणे शक्य झाल्याचे डॉ. सुप्रतिम सेन यांनी सांगितले.







