साहित्य अकादमीतर्फे २४ भाषांतील साहित्यकृतींसाठी देण्यात येणाऱ्या २०२५च्या पुरस्कारांची घोषणा अखेर सोमवारी करण्यात आली. मराठीसाठी राजू बाविस्कर यांच्या ‘ काळ्यानिळ्या रेषा ’ या आत्मकथनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला. येत्या ३१ मार्च रोजी दिल्लीतील समारंभात पुरस्कार वितरण होईल. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, ताम्रपट व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांत आत्मकथनासाठी केवळ मराठी साहित्यकृतीची निवड करण्यात आली. मराठीच्या परीक्षक मंडळात ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोराव उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता. ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत बाविस्कर यांनी आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवासाचे प्रभावी चित्रण केले आहे.
‘ साहित्य अकादमी पुरस्कार २०२५’ची प्रक्रिया जानेवारी २०२५मध्ये सुरू झाली आणि ३० जानेवारी २०२५ रोजी जाहिरात जारी करण्यात आली.
दरम्यान कोकणीसाठी हेनरी मेंडोनका (एचएम पेरनाळ) यांच्या ‘रूपा आनी रूपका’ला, इंग्रजीसाठी लेखक नवतेज सरना यांच्या ‘क्रिमसन स्प्रिंग’ कादंबरीला आणि हिंदीसाठी ममता कालिया यांच्या ‘जीते जी अलाहाबाद’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
उर्वरित
वृत्त... ५
मुलाखत... ८
पुणे : राजू बाविस्कर लिखित आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘काळ्यानिळ्या रेषा’ या पुस्तकाला सोमवारी ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला. या पुरस्काराच्या निमित्ताने सलग चौथ्या वर्षी अकादमीच्या पुरस्कारावर ‘राजहंसी’ मोहोर उमटली आहे. साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्काराने यापूर्वी ‘राजहंस’च्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ (२०२२), ‘ब्राह्मोस’ (२०२३), ‘विंदांचे गद्यरूप’ (२०२४) या साहित्यकृतींना गौरविले आहे. त्यामुळे यंदा सलग चौथ्यांदा अकादमीच्या पुरस्कारावर आशयसंपन्न साहित्यकृतींची निर्मिती करणाऱ्या ‘राजहंस’ने आपले नाव कोरले आहे. बाविस्कर यांचे ‘काळ्यानिळ्या रेषा’ कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या जगण्याला कलेचा नवा आयाम देणारे पुस्तक आहे.







