ज्ञानवापी मशिदीवरील सुनावणी तहकूब

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
hearing on gyanvapi mosque stalled
प्रयागराज : ज्ञानवापी मशिदीच्या वजूखाना परिसराचे ‘एएसआय’ सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी तहकूब केली. हिंदू पक्षाने ज्याचे वर्णन शिवलिंग म्हणून केले आहे, तर मुस्लिम पक्षाने कारंजे म्हणून केले आहे, ती रचना या सर्वेक्षणातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असून, न्यायालयात पुढील सुनावणीची तारीख १७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्ती रोहितरंजन अग्रवाल यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ३० नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली.

छत्तीसगडमध्ये महिलेवर ॲसिड हल्ला
बालोद : छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात २२ वर्षीय महिलेवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा कट तिचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने दुखावलेल्या प्रियकराने रचल्याचे पोलिसांनी सांगितले. आदल्या दिवशी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी आणि त्याच्या मित्राच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी महिला सोमवारी बालोद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंचाई कॉलनी परिसरातील ग्रंथालयात अभ्यास करून पायी घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ॲसिड फेकले होते.

लिव्ह इन पार्टनरवर दिल्लीत ॲसिड हल्ला

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात एका २४ वर्षीय महिलेवर माजी ‘लिव्ह-इन’ जोडीदाराने ॲसिड फेकले. महिलेने त्याच्याशी नाते तोडल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा ती महिला कामावर जात होती. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलिस शोध घेत आहेत.

एक किलो अमली पदार्थ दिल्लीत जप्त

जम्मू : जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी जम्मू जिल्ह्यात सीमापार ड्रोनद्वारे साहित्य पाडल्याच्या संशयास्पद प्रकरणात दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून एक किलो हेरॉइन, अफू व पिस्तूल जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थ पाडल्याच्या घटनेचा तपास करीत असताना अरनिया सेक्टरमधून या दोन आरोपींना अटक करण्यात आली.