विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले.
पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बंडखोर प्रताप ऊर्फ भय्या माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनीही अर्ज दाखल केला.पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेली होती. अखेर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बंडखोर माने यांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने पदवीधर मतदारसंघात ‘महायुती’मधील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत.
दरम्यान, शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या अर्ज दाखलवेळी महाविकास आघाडीतील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघांसाठी पक्षाचे उमेदवार मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार पुणे पदवीधर मतदार संघासाठी प्रा. सोमनाथ साळुंखे, तर शिक्षक मतदार संघासाठी डॉ. आय. सी. शेख हे रिंगणात आहेत.
दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यामध्ये काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांकडून उमेदवार दिले गेले आहेत. याशिवाय प्रा. सचिन सानप, माजी आमदार दत्तात्रय सामंत, अभिजित बिचुकले यांचेही अर्ज दाखल आहेत.