यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन थंडर’चे धडे

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन थंडर’चे धडे
‘ ड्रग्ज फ्री नागपूर ’साठी सुरू करण्यात आलेल्या ‘ ऑपरेशन थंडर ’ या मोहिमेची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना याचे धडे देण्यात येत आहेत. युवक व विद्यार्थ्यांना अमलीपदार्थांच्या व्यवसापासून परावृत्त करण्यासह ड्रग्ज तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी नागपूर आयुक्तालयात ‘ऑपरेशन थंडर’ ही मोहीम सुरू केली.

ऑपरेशन थंडरअंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एक हजारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. १ हजार ४३८ आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी या दोन वर्षांत १५०० किलो गांजा, १७ किलो मेफेड्रोनसह तब्बल २२ कोटींचे ड्र्रग्ज जप्त केले. पोलिसांनी केवळ विक्रेत्यांनाच अटक केली नाही तर, अमली पदार्थांची संपूर्ण साखळी नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी पुरवठादार, मध्यस्थ व अमली पदार्थांच्या तस्करीतील लाभार्थ्यांची पाळेमुळे खोदून काढली. शाळा-महाविद्यालये, झोपडपट्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्त्यांमध्ये जनजागृती करून युवकांना अमली पदार्थांच्या धोक्यापासून दूर ठेवण्याचा या मोहिमेद्वारे प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मित्रांचा दबाव, कुतूहलातून होणारे सेवन आणि व्यसनाच्या सुरुवातीची लक्षणे याबाबतही जनजागृती केली. या मोहिमेत विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, नागरिक व सामाजिक संघटनांनाही पोलिसांनी सामिल करून घेत समाजाच्या सामूहिक जबाबदारीचा संदेश दिला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सामान्य ज्ञानाच्या पेपर-३मध्ये सुरक्षा, संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, बेकायदा आर्थिक व्यवहार, गुप्त माहितीवर आधारित कारवाई आणि विविध यंत्रणांमधील समन्वय या मुद्द्यांचा समावेश आहे. अमली पदार्थांवर नियंत्रण व गुन्हेगारांवर कारवाई प्रश्नाचे सखोल उत्तर ‘ऑपरेशन थंडर’मध्ये आहे.

शिकवणी वर्गात यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन थंडर’चे धडे देण्यात येत आहेत. काही पुस्तकांमध्येही या मोहिमेचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, अशा शब्दांत तत्कालीन पोलिस आयुक्त व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी भावना व्यक्त केल्या.