कम्प्युटर सायन्सकडे ओढा कायम

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कम्प्युटर सायन्सकडे ओढा कायम
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई-ॲडव्हान्स्ड २०२६च्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती यंदाही कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगला (सीएसई) असल्याचे स्पष्ट झाले आहे. अव्वल पाचशे श्रेणीधारकांपैकी ३६५ विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम निवडला असून, याच गटातील १८३ विद्यार्थ्यांनी ‘आयआयटी, मुंबई’ला पसंती दिली, अशी माहिती अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे.

‘आयआयटी, मुंबई’ला पसंती
 जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘आयआयटी, रुरकी’च्या २०२६च्या जॉइंट इम्प्लिमेंटेशन कमिटीने ही आकडेवारी दिली आहे.

 ‘प्रत्येक प्रवर्गातील उपलब्ध जागांच्या तुलनेत किमान दुप्पट उमेदवार पात्र ठरावेत, यासाठी पात्रता निकष शिथिल करण्यात आले,’ असे या अहवालात म्हटले आहे.

 मागील काही वर्षांतील कल यंदाही कायम असल्याचे या आकडेवारीतून दिसून आले.

 ‘आयआयटी, मुंबई’खालोखाल ‘आयआयटी, दिल्ली’ला विद्यार्थ्यांची पसंती होती. आयआयटी दिल्लीमध्ये ११५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

 याशिवाय, या अव्वल विद्यार्थ्यांपैकी ७८ जणांनी आयआयटी मद्रासची निवड केली. तर, ‘आयआयटी, कानपूर’ आणि ‘आयआयटी, खरगपूर’मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ४९ आणि ४० होती.

 आयआयटीमध्ये प्रवेश मिळवलेल्या अव्वल शंभर विद्यार्थ्यांपैकी ६८ जणांनी ‘आयआयटी, मुंबई’, १८ जणांनी ‘आयआयटी, दिल्ली’, ११ जणांनी ‘आयआयटी, मद्रास’ आणि एका विद्यार्थ्याने ‘आयआयटी, कानपूर’ची निवड केली.

 अव्वल श्रेणीधारकांमध्ये शाखेच्या निवडीबाबत सीएसई पहिल्या क्रमांकावर राहिले. अव्वल पाचशे श्रेणीधारकांपैकी ३६५ जणांनी हा अभ्यासक्रम निवडला. यापैकी केवळ ‘आयआयटी, मुंबई’मधील विद्यार्थ्यांची संख्या १४२ होती.

 अव्वल पाचशे विद्यार्थ्यांपैकी केवळ दोघांनी सिव्हिल इंजिनीअरिंगची निवड केली, तर एरोस्पेस इंजिनीअरिंगची निवड एकाही विद्यार्थ्याने केली नाही.

 याशिवाय, केवळ १७ विद्यार्थ्यांनी एआय (कृत्रिम प्रज्ञा) आणि डेटा ॲनालिटिक्स या अभ्यासक्रमांची निवड केली.

मुलींच्या यशाचे प्रमाण अधिक

 जेईई (मेन) मधील अव्वल २.५ लाख उमेदवार जेईई (ॲडव्हान्स्ड) परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरतात.

 १७ मे रोजी झालेल्या जेईई-ॲडव्हान्स्ड २०२६ परीक्षेत पेपर १ आणि पेपर २ हे दोन्ही पेपर १,७९,६९४ उमेदवारांनी दिले. या परीक्षांचा निकाल एक जून रोजी जाहीर करण्यात आला होता. यामध्ये ५६,८८० उमेदवार पात्र ठरले.

 २०२६ मधील आयआयटी जेईई-ॲडव्हान्स्ड प्रवेश परीक्षेत महिला उमेदवारांच्या यशाचे प्रमाण सर्वाधिक होते.

 गेल्या सहा वर्षांत प्रथमच पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची संख्या दहा हजारच्या पुढे गेली.