आईला मिळाली माया, लेकरांना मिळाली आई!

Contributed by: नागपूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आईला मिळाली माया, लेकरांना मिळाली आई!
जवळपास दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या छत्तीसगडमधील महिलेचा तिच्या कुटुंबीयांशी दहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पथकाने संपर्क घडवून आणला. जागतिक मानसिक आरोग्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या पुनर्मिलनाने रुग्णालयातील वातावरण भावूक झाले. ‘तुम्ही आम्हाला अनाथ होण्यापासून वाचवले,’ या मुलाच्या शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.

अंदाजे ४५ वर्षांच्या या महिलेला न्यायालयाच्या आदेशानुसार भंडारा पोलिसांनी २ जानेवारी २०२६ रोजी उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. तिच्याजवळ ओळखपत्र नव्हते. स्वतःच्या नावाबाबतही ती साशंक होती. दोन वेगवेगळी नावे सांगण्यासह भाषेची अडचण आणि अस्पष्ट बोलणे यामुळे कुटुंबीयांचा शोध घेणे आव्हानात्मक होते.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज बागडे आणि डॉ. कुणाली उके यांनी उपचार केले. मानसिक स्थिती सुधारल्यानंतर महिलेला घराची व मुलांची आठवण येऊ लागली. समाजसेवा अधीक्षक कुंदा काटेखाये-बिडकर यांनी नऊ महिन्यांपासून तिचे समुपदेशन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्तीसगड व मध्य प्रदेशातील आठ ते नऊ पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला. जबलपूरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयाशीही पत्रव्यवहार करण्यात आला.

महिलेने कोरबा जिल्ह्यातील नातेवाइकांचा उल्लेख केल्यानंतर बिडकर यांनी रायपूर येथील मदर तेरेसा आश्रमाच्या समन्वयक संगीता पारेकर यांची मदत घेतली. कोरबाचे पोलिस निरीक्षक नरहरी पटेल यांनी चौकशी करून जबलपूरमधील रतनपूर पोलिसांशी संपर्क साधला. अवघ्या तीन तासांत मुलाचा शोध लागला. व्हिडीओ कॉलनंतर दोन दिवसांत मुलगा व जावई महिलेला घरी घेण्यासाठी आले.

बिडकर यांच्यासह, मेट्रन प्रतिभा मानकर, इन्चार्ज सिस्टर वनश्री तोतावार, अनुचर सुशीला उके, पद्मा पुयाड, अनिता महाबुधे, सरिता आणि आशा उपस्थित होत्या. कर्मचाऱ्यांनी महिलेला साडी, ड्रेस व साजशृंगाराच्या वस्तू आहेर म्हणून दिल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमरीश मोहबे यांनी हे पुनर्मिलन वैद्यकीय उपचार, सामाजिक कार्य आणि पोलिस यंत्रणेच्या समन्वयाचे उदाहरण असल्याचे सांगितले.