लादेनप्रमाणे दाऊदही पाकिस्तानातच

Contributed by: वृत्तसंस्था,न्यूयॉर्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
लादेनप्रमाणे दाऊदही पाकिस्तानातच
गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नेतृत्वाखालील डी-कंपनीला ‘भारतातील गुन्हेगारी टोळी’ असे संबोधणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील माहितीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘संयुक्त राष्ट्रांकडील नोंदींनुसार, अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला आणि तिथेच ठार झाला. दाऊददेखील त्याच देशात राहत आहे,’ या शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांना खडसावून सांगितले.

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनमधील प्रथम सचिव रघू पुरी यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या तिसऱ्या समितीत भारताची भूमिका मांडली. दहशतवादाचा मुकाबला करताना मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांचे संरक्षण या विषयावरील संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी बेन सॉल यांच्या अहवालावर उत्तर देताना त्यांनी हा प्रतिवाद केला. या अहवालात गंभीर तथ्यदोष असल्याचे सांगत, अशा अकार्यक्षमतेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेला मोठी हानी पोहोचते, असे पुरी यांनी सुनावले.
सन २००३मध्ये सुरक्षा परिषदेने अल-कायदाशी संबंध असल्याच्या कारणावरून भारतातील डी-कंपनी या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाला यादीत समाविष्ट केले, असे सॉल यांच्या अहवालात म्हटले असल्याचे पुरी यांनी निदर्शनास आणले.

डी-कंपनीला ‘भारतातील’ म्हणण्यास विरोध करून पुरी म्हणाले , की ही गुन्हेगारी टोळी आणि तिचा म्होरक्या दाऊद इब्राहिम सन १९९३पासून दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांत भारताला हवा आहे.