व्यापार दुप्पट करण्याचा निर्धार

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
व्यापार दुप्पट करण्याचा निर्धार
दहशतवादाविरोधात एकत्र

भारत आणि पोलंड यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य गुरुवारी निश्चित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली.
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारावर (एफटीए) लवकर स्वाक्षरी करून त्याला मान्यता देण्याचे आणि त्याची वेळेत अंमलबजावणी करण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होतील, महत्त्वाच्या पुरवठा साखळ्या अधिक सक्षम होतील आणि नव्या बाजारपेठा खुल्या होतील, असे निवेदनात म्हटले आहे. मोदींनी पोलंडमधील कंपन्यांना भारतातील गुंतवणूक आणि व्यवसायविस्तार वाढविण्याचे आवाहन केले. भारतातील मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ; तसेच उत्पादन आणि नवोन्मेष क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलंडमधील भारतीय गुंतवणुकीचे टस्क यांनी स्वागत केले. मध्य आणि पूर्व युरोप; तसेच व्यापक युरोपीय बाजारपेठेत व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी पोलंड हे प्रवेशद्वार ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

संयुक्त राष्ट्रांची प्रासंगिकता, विश्वासार्हता कायम राखण्यासाठी संरचनात्मक सुधारणांची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. विस्तारित सुरक्षा परिषदेत भारताच्या सदस्यत्वाला पोलंडने पाठिंबा दर्शविला.

दहशतवादाविरोधात एकत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी गुरुवारी दहशतवाद आणि हिंसक कट्टरतावादाचा निषेध केला. दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न सुरू ठेवावेत, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. नवी दिल्लीतील हैदराबाद हाउस येथे झालेल्या बैठकीत मोदी आणि टस्क यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ‘जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला,’ असे मोदी आणि टस्क यांच्या चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या युक्त निवेदनात म्हटले आहे.