स्त्रीबीज तस्करी; ईडीचे अनेक छापे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
female gamete smuggling case eds rigorous raids exposed false records
(पान एकवरून) मध्यस्थांमार्फत हे व्यवहार होत असल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत महिलांना आर्थिक मोबदला देण्यात येत होता. आयव्हीएफ केंद्रे आणि एआरटी बँका मध्यस्थांमार्फत हा मोबदला देत असल्याचा, तसेच मध्यस्थांना या व्यवहारांतून कमिशन मिळत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणातील ईडीचा तपास ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्रावर आधारित आहे. मंजुषा वानखेडे आणि अन्य १६ जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर तसेच साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याच्या उल्लंघनाचे आरोप करण्यात आले आहेत. ईडीने हा तपास मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरू केला आहे.

स्त्रीबीज दात्यांची ओळख लपविणे, त्यांच्याकडून वारंवार स्त्रीबीज मिळवणे आणि त्यांची वैद्यकीयदृष्ट्या योग्य असल्याची खोटी नोंद तयार करणे यासाठी आधार कार्ड, प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्रे, जन्मदाखले, पॅन कार्ड, रक्ततपासणी अहवाल आणि विम्याची कागदपत्रे बनावट तयार केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. महिलांना स्त्रीबीज काढण्याच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध केंद्रांमध्ये पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण झाला आणि निर्धारित वैद्यकीय सुरक्षा नियमांना बगल देण्यात आली, असे ईडीने म्हटले आहे. छाप्यांदरम्यान २९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्याबरोबरच बँक लॉकर आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक गोठवण्यात आली. या प्रकरणात आणखी काही स्त्रीबीज पुरवठादार मध्यस्थांची ओळख पटल्याचेही ईडीने सांगितले.