सौदीतील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू

Contributed by: वृत्तसंस्था,दुबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
indian killed in attack in saudi three injured
सौदी अरेबियातील प्रमुख विमानतळ आणि तेलक्षेत्रावर झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर तीन भारतीय जखमी झाले आहेत. येमेनमधील हुती बंडखोरांकडून सौदीतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असतानाच ही घटना घडली.

पूर्व सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अधिकाऱ्यांनी दिली. हा विमानतळ पर्शियन आखाताच्या परिसरात बहरीन आणि कतारच्या जवळ आहे. बुधवारी रात्री यावर हल्ला झाला. ‘दम्माम विमानतळावर काल रात्री झालेल्या हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांमध्ये एक सौदी आणि एक भारतीय नागरिक होता. तसेच दोन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत,’ असे भारतीय दूतावासाने गुरुवारी ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले.
‘आम्ही अधिक तपशील तपासत आहोत आणि प्रभावित कुटुंबीयांशी संपर्क साधत आहोत,’ असेही दूतावासाने नमूद केले आहे. याचे विमानतळाला यापूर्वी ११ ऑक्टोबरलाही लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून, त्यात दोन भारतीय, बांगलादेशी आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.