पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर आणि मालदीवचे अध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य व संस्थात्मक संबंध मजबूत करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही देश आपले द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्नशील असताना ही बैठक पार पडली आहे.
पाकिस्तानचे ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ म्हणूनही कार्यरत असलेल्या मुनीर यांनी मालदीवच्या अध्यक्षांच्या तीन दिवसीय पाकिस्तान दौऱ्यादरम्यान बुधवारी इस्लामाबाद येथे त्यांची भेट घेतली. मुनीर यांनी पाकिस्तान आणि मालदीव यांच्यातील संबंध अधोरेखित केले. मालदीवच्या अध्यक्षांचा हा ११ वर्षांनंतरचा हा पाकिस्तान दौरा आहे.संरक्षण सहकार्य आणि लष्करी क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी पाकिस्तान, तुर्किये, कतार आणि इंडोनेशिया या चार देशांमध्ये दोहा येथे बहुपक्षीय ‘बद्र’ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कतारच्या संरक्षण मंत्रालयानुसार, या कराराचा मुख्य उद्देश संरक्षण उत्पादन, तांत्रिक प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवणे हा आहे.