छायाचित्र प्रदर्शनावरून राजकीय वाद

Contributed by: नवी दिल्ली,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
छायाचित्र प्रदर्शनावरून राजकीय वाद
काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांचे पुत्र, छायाचित्रकार रेहान वद्रा यांच्या छायाचित्र प्रदर्शनावरून गुरुवारी राजकीय वाद निर्माण झाला. दिल्लीतील बिकानेर हाऊसमध्ये आयोजित त्यांच्या प्रदर्शनातून ७० हून अधिक छायाचित्रे काढून टाकण्यास सांगण्यात आल्याचा आरोप रेहान यांनी केला आहे. ही छायाचित्रे गेल्या वर्षभरातील दिल्लीतील विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनांवरील ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ आहेत.

रेहान वद्रा यांच्या या प्रदर्शनाचे नाव ‘नो आयडिया इज फाइन’ असे होते. बुधवारी संध्याकाळी हे प्रदर्शन सुरू होणार होते. मात्र, प्रदर्शन सुरू होण्याच्या २४ तास आधी बिकानेर हाउस व्यवस्थापनाने संपर्क साधून काही छायाचित्रे त्यांच्या धोरणाविरुद्ध असल्याचे सांगितले, असा दावा रेहान यांनी केला.
रेहान यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्रदर्शनाचे नियोजन आठवडाभरापूर्वी व्यवस्थापनाला पाठवण्यात आला होता. तेव्हा आक्षेप का घेतला नाही, असे विचारल्यावर आराखडा पाहता आला नाही, असे सांगण्यात आले. मग प्रदर्शन सुरू होण्याच्या काही तास आधी मी काय करणार? मी त्यांना लेखी स्वरूपात कारणे देण्यास सांगितले. प्रत्येक छायाचित्र का काढले जात आहे, याचे स्पष्टीकरणही मागितले; पण तसे करण्यात आले नाही.’ या प्रकरणात राजकीय हेतू आहे का, याबद्दल निश्चित सांगता येणार नाही, असे रेहान यांनी नमूद केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारे निर्बंध आणू नयेत, असे ते म्हणाले.