The Audio Clip Of Manoj Jarge Needs Immediate Investigation
‘जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘ही ऑडिओ क्लिप बाहेर कशी आली, तिची सत्यता काय आहे, त्यात तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे का, ती अवैध पद्धतीने तयार किंवा प्रसारित करण्यात आली आहे का, तसेच ती याच वेळी का समोर आणली गेली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी भाजप नेते आणि मंत्री आशीष शेलार यांनी केली.
उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनीही या क्लिपमधील आंदोलनासंदर्भातील उल्लेख कोणी आणि कशासाठी केले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपकडून शेलार यांनी अधिकृत भूमिका मांडली.‘उदय सामंत यांचा गैरसमज झाला असेल. त्यांनी नीट समजून घेतले असते, तर असे विधान केले नसते. ज्या ऑडिओ क्लिपची सत्यता निश्चित झालेली नाही, ज्याची चौकशी झालेली नाही आणि ज्याला पूरक पुरावा नाही, अशा क्लिपवरून निष्कर्ष काढता येत नाही’, असे शेलार यांनी सांगितले. या क्लिपमध्ये भाजपच्या कोणत्याही नेत्याचा आवाज नाही, असा दावा त्यांनी केला. ‘ऑडिओ क्लिप खरी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तंत्रज्ञानाशी संबंधित अशा बाबींमध्ये पूरक पुरावा असेल तरच त्या सत्य मानल्या जातात. याबाबत गैरसमज असेल, तर तो दूर करू’, असे शेलार म्हणाले.
‘जरांगे यांच्याकडे ही ऑडिओ क्लिप कोणी दिली, ती खरी आहे की नाही, याची तपासणी होणे गरजेचे आहे. जरांगे यांनीही चौकशीची मागणी केली आहे. आम्हीही तीच भूमिका घेत आहोत. ही ऑडिओ क्लिप १०० टक्के असत्य आहे’, असा दावा त्यांनी केला.
‘एसआयटी’मार्फत सखोल चौकशीची गरज!
भाजप प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनीही या क्लिपवर प्रतिक्रिया दिली. ‘‘एआय’च्या जमान्यात बनावट ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ वेगवेगळ्या स्वरूपात बाजारात येत असतात. त्यामुळे जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची ‘एसआयटी’ स्थापन करून सखोल चौकशी करून सत्य शोधून काढावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करीत आहोत’, असे बन यांनी सांगितले.