‘सीजेपी’चे दिल्लीत पुन्हा धरणे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
cjp protest shocking incident at jantar mantar and arrest of bharadwaj
‘नीट’ पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) कार्यकर्त्या निशू आझाद यांच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या स्वतंत्र भारद्वाजच्या अटकेसाठी ‘सीजेपी’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यासमोर तीन तास आंदोलन केले. यानंतर, दिल्ली पोलिसांनी भारद्वाज याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातून ताब्यात घेतले.

‘सीजेपी’चे सहसंयोजक सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले. आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद; तसेच अपक्ष खासदार पप्पू यादवही तेथे दाखल झाले. आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप निशू आझाद यांनी केला असून, त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘सीजेपी’ने केली आहे.
दरम्यान, जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला करणे ही विदारक आणि गंभीर चिंतेची बाब आहे, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी शुक्रवारी केले. एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी त्यांनी जंतरमंतरवरील घटनेवर भाष्य केले.

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान २३ जुलै रोजी निशू आझाद यांचे वडील संजयकुमार यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. संजयकुमार यांच्या तक्रारीवरून संसद मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, या प्रकरणी कारवाई होत नसल्याचा आरोप ‘सीजेपी’ने केला होता. यानंतर भारद्वाजचा एका पॉडकास्टमधील व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात त्याने संजय कुमार यांच्या डोक्यावर हत्याराने वार केल्याचे सांगितल्याचा दावा ‘सीजेपी’ने केला. त्यानंतर त्याच्या अटकेची मागणी तीव्र झाली.