मविआ, युतीत ‘फॉर्म’चा गोंधळ

Contributed byम.टा.विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राजकीय पक्षांमध्ये एबी फॉर्म वाटपावरून मोठा गोंधळ सुरू आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटात जागा वाटपावरून मतभेद आहेत. महाविकास आघाडीतही शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे यांच्यात जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अनेक ठिकाणी पक्षांनी अधिक उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरीची शक्यता आहे.

मविआ, युतीत ‘फॉर्म’चा गोंधळ

भाजपविरोधात उभ्या ठाकलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्येही एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती असतानाही शिंदेसेनेने ९५ जागांवर, तर राष्ट्रवादीनेही ३५ पेक्षा अधिक जागांवर एबी फॉर्म वाटप केल्याचे समोर आले आहे. तसेच महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाला ६० जागा मिळाल्या असताना, या पक्षाकडूनही ७५ पेक्षा अधिक ठिकाणी एबी फॉर्म वाटल्याने मविआतील गोंधळ समोर आला आहे.

नाशिक महापालिकेसाठी भाजपने स्वबळावर नारा दिल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने वेगळा घरोबा करत युतीची घोषणा केली. दोन्ही पक्षांनी भाजपच्या बंडखोरांवर लक्ष ठेवताना शिंदेसेनेने ८५, तर राष्ट्रवादीने ३५ जागा लढण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेसेनेकडून मोठ्या संख्येने एबी फॉर्मचे वाटप केल्याचे समोर आले आहे. शिंदेसेनेने आपल्याकडे असलेल्या ४० माजी नगरसेवकांसह नव्याने जवळपास ५५ इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडून ९५ पेक्षा अधिक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही ३५ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. त्यामुळे गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.

मविआतही गोंधळाची स्थिती

शिवसेना उबाठाने ६० जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असताना अधिक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. मनसे आणि काँग्रेसकडूनही अधिकचे एबी फॉर्मचे वाटप केले आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षाच्या वाट्याला १५ जागा आल्याचे सांगितले जात होते. परंतू उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने तब्बल २३ उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले. काँग्रसने आपल्या २३ उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केली. यामध्ये माजी नगरसेवक वत्सला खैरे, लक्ष्मण जायभावे, गुलजार कोकणी आदींना उमेदवारी दिली आहे. प्रभाग १४ मध्ये पक्षाने चार उमेदवार दिले आहेत.