चिनी ताशांमुळे ‘टिमकी’ला घरघर!

Contributed byयोगेंद्र वाघ|महाराष्ट्र टाइम्स

The traditional Timki business in Yeola faces a crisis. Chinese-made fiber drums and similar instruments are impacting the local craft. This traditional art form, made from animal hides, is struggling against cheaper, attractive alternatives. Production costs have risen, making it difficult for local artisans to compete. The future of this unique Yeola business is uncertain as demand shifts.

चिनी ताशांमुळे ‘टिमकी’ला घरघर!

होळीच्या पार्श् वभूमीवर येवल्याचे वैशिष्ट असलेली टिमकी बाजारात आली असली, तरी चिनी मार्केटमधून बाजारात आलेले फायबरचे ताशे व तत्सम बाजे यामुळे येथील टिमकी व्यवसायाला घरघर लागली आहे. भविष्यात येवल्यातील हा व्यवसाय डबघाईस येण्याच्या मार्गावर आहे.

शहरातील चर्मकार समाजातील रंगनाथ कचरू पुरे यांच्यासह काही कुटुंब परंपरेने जनावरांच्या कातडीपासून टिमकी बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत. येवल्यात होळी आणि धूलिवंदन निमित्ताने टिमक्या वाजविल्या जातात. सध्या बाजारात टिमक्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. दरवर्षी सात ते आठ हजारांच्या आसपास टिमक्या बनविल्या जात, परंतु यंदा ती संख्या अवघ्या हजाराच्या आत आली आहे.

आता चामड्याची जागा फायबरने घेतली. चिनी बनावटीचे फायबरचे ताशे व तत्सम वाद्ये बाजारात उपलब्ध असल्याने टिमकी व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. यंदा तर या टिमक्यांनाही महागाईचा मोठा फटका बसल्याने नेहमीपेक्षा वीस-पंचवीस टक्क्यांनी भाववाढही झाली आहे.

उत्पादन खर्च वाढला...

पारंपरिक टिमकी बनवताना लोखंडी रिंग, जनावराचे कातडे यांचा वापर होतो. नेमके हेच दिवसेंदिवस महागले आहे. यामुळे आकारानुसार ८०, १२५, १५० असे टिमकीचे दर आहेत. यात उत्पादन खर्च वाढला असला, तरी कारागिरांना मेहनतीच्या तुलनेत उत्पन्न कमीच आहे. बाजारातील चिनी बनावटीचे प्लास्टिक वा फायबर ढोल-ताशे शंभर सव्वाशे रुपयात मिळतात. ते आकर्षक असल्याने मुले त्याकडे आकर्षित होत आहेत.