जास्त परताव्याचे आमिष दाखवून बागलाण व देवळा तालुक्यातील नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुवर्ण इंद्रधनू फॅटर्निटी फंड प्रा. लि. या नाशिकस्थित कंपनीकडून तब्बल २२ गुंतवणूकदारांची सुमारे ३६ लाख ४८ हजार ७५९ रुपये इतक्या रकमेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील तक्रारदार राकेश खरोले यांनी सटाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित कंपनीने १०० दिवस, ४०० दिवस आणि ५०० दिवसांच्या विविध गुंतवणूक योजना राबवल्या होत्या. ‘दररोज ठराविक रक्कम जमा केल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर अधिक लाभांश दिला जाईल,’ असे सांगत नागरिकांना आकर्षित करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आल्याने इतरांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, मुदत पूर्ण होऊनही अनेकांना मूळ रक्कम व लाभांश मिळाला नसल्याची तक्रार आहे. काही गुंतवणूकदारांना देण्यात आलेले धनादेश बँकेत सादर केल्यानंतर ते वठत नसल्याचेही समोर आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी कंपनीचे संचालक विकास चौधरी, रवींद्र चव्हाण, अजय लोखंडे, प्रशांत आहेर, सुनील ताराठे आणि महावीर गांधी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल बोरसे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे बागलाण व देवळा तालुक्यातील गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, अशा योजनांबाबत नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







