वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान सुपर ८मध्येच संपुष्टात आले. आक्रमक सुरुवातीनंतर पाकिस्तानला २१२ धावांवरच समाधान मानावे लागले. सुपर ८मधील प्रवेश निश्चित करण्यासाठी पाकला श्रीलंकेला १४७ धावांत रोखणे आवश्यक होते; मात्र श्रीलंकेने यापेक्षा जास्त धावा केल्यामुळे पाकिस्तानचे आव्हान आटोपले आणि न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. दसुन शनाकाच्या फटकेबाजीमुळे पाक स्पर्धेबाहेरच गेले नाहीत, तर त्यांच्यावर पराभवाची नामुष्कीही दिसत होती; मात्र अखेर पाकिस्तानने पाच धावांनी विजय मिळवला.
शतकवीर साहिबझादा फरहान आणि फखर झमान यांनी १७६ धावांची भागीदारी १५ षटकांतच केल्यानंतरही पाकला त्याचा फायदा घेता आला नाही. त्यांची द्विशतक करताना दमछाक झाली. पाकने श्रीलंकेचे दोन फलंदाज ३३ धावांत बाद करून सुरुवात चांगली केली होती; मात्र श्रीलंकेने हार मानली नाही. पवन रत्नायकेच्या आक्रमक अर्धशतकामुळे चिरथ असालांका आणि दसुन शनाका यांची साथ लाभली. त्यामुळे श्रीलंकेने प्रतिहल्ला सुरू केला. स्पर्धेची विजयी सांगता करण्यात श्रीलंकेस अपयश आले; मात्र त्यांच्या झुंजार खेळामुळे पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेले. श्रीलंकेला विजयासाठी दोन षटकांत ४८ आणि त्यानंतर अखेरच्या षटकांत २८ धावांची गरज होती; मात्र शनाकाचे झुंजार प्रयत्न थोडक्यात कमी पडले. मात्र त्याच्या या कामगिरीमुळे न्यूझीलंडला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.
स्कोअरबोर्ड : पाकिस्तान ८ बाद २१२ (साहिबझादा फरहान १०० - ६० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकार, फखर झमान ८४ - ४२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकार, शादाब खान ७, सलमान आगा ०, उस्मान खान नाबाद ८ - ४ चेंडूंत १ चौकार, दिलशान मदुशंका ४-०-३३-३, दुष्मंथा चमिरा ४-०-४८-१, दसुन शनाका ४-०-४२-२) वि. वि. श्रीलंका - ६ बाद २०७ (कामिल मिशारा २६ - १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार, चरित असालंका २५ - १८ चेंडूंत १ चौकार व २ षटकार, पवन रत्नायके ५८ - ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार, दसुन शनाका नाबाद ७६ - ३१ चेंडूंत २ चौकार व ८ षटकार, अबरार अहमद ४-०-२३-३).







