मुं बईकर ते नाशिककर होण्याच्या प्रक्रियेला आता ३४ वर्षे झाली. तेथील महा नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीने मला अस्मरणीय अशा आठवणी दिल्या. विद्यार्थी चळवळीतून आल्याने एखादे पद हे सेवा करण्यासाठीच असते यावरही आजही मी ठाम आहे. १९९२ साली नाशिक महानगरपालिकेची पहिली निवडणूक होणार होती. १९९२ हे वर्ष शिक्षण संपून आयुर्वेद सेवेत प्रत्यक्ष प्रॅक्टिस सुरू होण्याचा काळ आणि नाशिक महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असा योगायोग जुळून आला. समाजकार्याची ओढ आणि सामाजिक आस्था असलेल्या विद्यार्थी चळवळीतील एका मित्राने नगरसेवक म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने उत्साह दुणावला होता. तो मित्र म्हणजे ॲड. मनीष बस्ते. आम्ही विद्यार्थी चळवळीत असताना निसर्ग, संस्कार आणि सेवा या समान विचारांमुळे एकत्र आलो होतो. तीन महिन्यांवर माझ्या रुग्णालयाचे उद्घाटन असतानाच प्रचाराची रणधुमाळीही मी आणि माझी नववधू निवडणूक प्रचारात हिरीरीने सहभागी झालो.
नाशिक महानगरपालिकेची पहिली निवडणूक ज्यात पहिल्यांदा मत दिले, त्याचा अभिमान आजही अनेक जण बाळगत असतील. त्या वेळी मला फारसे राजकारणाचे ज्ञान नव्हते, पण उमेदवार अभ्यासू, कार्यतत्पर आणि ‘माझे गाव’ ही भावना जपणारा हवा हे अभिमानाने प्रचारात सांगता येत होते. त्या वेळी आश्वासने कमी होती, पण कृतिशील आत्मविश्वास मोठा होता. प्रचारात तरुणवर्ग हाताशी घेतला. पक्ष वगैरे हा विषय नव्हता. कारण ॲड. बस्ते सायकल चिन्हावर अपक्ष लढत होते. त्यामुळे पक्षापेक्षा विकास संकल्पना मतदारांमध्ये रुजवित होतो. कोणतीही अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता आणि प्रलोभन न देता आम्ही फिरत होतो. विद्यार्थी चळवळीत लोकांसाठी जे केले, तेच तो नाशिकसाठी करायचे. पंडित कॉलनीतील सर्व तरुण मित्र पक्ष, पुढारी, गणिते सगळे विसरून एकाच ध्यासाने प्रचार करत होते. निवडून येण्याची आकडेमोड कोणीच करत नव्हते, जशी आज केली जाते. त्यावेळच्या प्रामाणिक प्रचाराचा परिणाम म्हणजे मनीष बस्ते निवडून आले. आपला चळवळीतील मित्र आणि आयुर्वेद सेवेला पाठबळ देणारा नगरसेवक मिळाला होता. नाशिक हे माझे गाव प्रगतिपथावर कसे जाईल हा ध्यास जर सर्वांनी निवडणुकांमध्ये घेतला, तर निवडणुकीचा आणि आपल्या गावासाठी केलेल्या कार्याचा अभिमान नक्कीच वाटेल.








