‘अमरावती हीच राज्याची एकमेव राजधानी असून, ती कोणत्याही परिस्थितीत हलवता येणार नाही,’ असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी ठणकावून सांगितले. नेल्लोर जिल्ह्यातील ‘पेडाला सेवाळो’ (गरजूंच्या सेवेसाठी) या कार्यक्रमानंतर आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
विधानसभेने अमरावतीला कायदेशीर मान्यता देण्याचा ठराव आधीच मंजूर केला आहे, असे नायडू म्हणाले. लोकसभेत अमरावतीला राजधानी म्हणून मान्यता देणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते म्हणाले, ‘अमरावतीचा एक इंचही भाग हलवला जाणार नाही. अमरावती हीच आंध्र प्रदेशाची राजधानी आहे. मागील ‘वायएसआरसीपी’ सरकारच्या त्रिराजधानी संकल्पनेमुळे राज्याच्या प्रगतीला मोठा अडथळा आला,’ असा आरोपही त्यांनी या वेळी केला. यापूर्वीच्या सरकारने राज्याला ‘तीन राजधानी’ (विशाखापट्टणम, अमरावती आणि कर्नूल) करण्याचा निर्णय घेतला होता.
लोकसभेत विधेयक मंजूर
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशची एकमेव आणि कायम राजधानी म्हणून अमरावतीला मान्यता देणारे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर झाले. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) काँग्रेसनेही या विधेयकाला पाठिंबा दिला. चर्चेदरम्यान वायएसआर काँग्रेस पक्षाने या विधेयकाला विरोध केला आणि मंजुरीवेळी सभागृहातून निषेधार्थ सभात्याग केला. अमरावतीला कायमस्वरूपी राजधानी करण्याच्या निर्णयात भविष्यात कोणताही बदल करता येऊ नये, यासाठी हे विधेयक आणण्यात आले होते. ते आवाजी मतांनी मंजूर करण्यात आले. हा निर्णय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची मागणी पूर्ण करणारा आहे.





