युक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान बदल तज्ज्ञ समितीतर्फे दर वर्षी हवामान बदल परिषदेचे आयोजन केले जाते. मी अकरा वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या या परिषदेचे वार्तांकन केले, त्या वेळी हवामान बदलांमुळे होत असलेल्या नुकसानाविषयी पोटतिडीकीने बोलणाऱ्या छोट्या देशांचे प्रतिनिधी, बेटांवर राहणाऱ्या लोकांच्या कथा ऐकून थक्क झाले होते. तापमानात वेगाने होणारी वाढ, त्यातून ऋतूचक्रात झालेले बदल, समुद्राची वाढती पातळी, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटांची तीव्रता यासंह असंख्य समस्यांचा पाढा ही मंडळी परिषदेमध्ये मांडत होती. हवामानातील बदल आणि अर्थकारण यावर अर्थतज्ज्ञांकडून विश्लेषण सुरू होते. आज आम्ही जात्यात, तुम्ही सुपात आहात.. असे विश्लेषक वारंवार सांगत होते.
नैसर्गिक आपत्तींमुळे दर वर्षी या देशांचे, छोट्या बेटांचे अब्जावधी रुपयांचे होणारे नुकसान, सततचे अनिश्चिततेचे सावट, त्यातून ‘हॅपिनेस इंडेक्स’वर झालेला परिणाम याच्या बातम्या लिहिताना, मनात कुठे तरी ‘बरं झालं आपण पुण्यासारख्या सुरक्षित आणि समृद्ध शहरात राहतो’ असा विचारही येत होता. आपल्याकडे प्रत्येक ऋतू किती मोजून मापून असतो, पावसाळ्यात पाऊस, हिवाळ्यात आल्हाददायक गारठा, उन्हाळ्यात तीव्र ऊन; पण रात्रीचे वातावरण सुसह्य असते.
वादळ, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आपल्याकडेही येतात, तरीदेखील इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती कमी आहेत, याबद्दल समाधानाची भावना होती. मात्र, आता उत्तम हवामान असलेल्या पुण्याचे वातावरण बदलले आहे याची खंत वाटते आहे. गेल्या पाच ते सात वर्षांत ऋतूचक्रात नोंदवले गेलेले तीव्र बदल जागतिक हवामान बदलाचे संकट पुणेकरांच्या दारापर्यंत आल्याचे संकेत देत आहेत.
गेल्या दोन दशकांतील झपाट्याने झालेल्या कामांमुळे पुण्याचा चेहरामोहरा बदला आहे. काही उपनगरे परदेशांतील उच्चभ्रू शहरांप्रमाणे विकसित झाली आहेत, आधुनिक सोसीसुविधांनी परिपूर्ण, आरामदायी जीवनशैली दर्शविणाऱ्या चकाचक गगनचुंबी इमारती, सोसायट्या आता स्मार्ट पुण्याचे चित्र दाखवत आहेत; पण दुसऱ्या बाजूला निसर्ग-पर्यावरण, हवामानाला गृहीत धरून केलेल्या असंख्य अशास्त्रीय विकासकामांमुळे या शहराचे आरोग्य ढासळले आहे. ऋतूचक्रातील बदलांमधून त्याचे दृश्यपरिणाम आता आपल्याला दिसायला लागले आहेत. सुरुवात पावसाळ्यापासूनच करू या.
पुण्याने या पूर्वी एखाद्या वर्षी सरासरी एवढा, एखाद्या वर्षी तो दुपटीहून अधिक; तर कधी दुष्काळाचाही सामना केला आहे. अलीकडील दोन दशकांत मात्र, हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, पुण्यातील पावसाचे सरसरी एकूण वार्षिक प्रमाण फारसे बदललेले नसले, तरी पावसाच्या ‘पॅटर्न’मध्ये टोकाचा बदल झाला आहे. पूर्वी पाऊस संथ गतीने आणि दीर्घ काळ पडायचा. आता तो ढगफुटीसदृश (क्लाउड बर्स्ट) पडतो. पाऊस पडण्याचे दिवस कमी झाले असून, अल्पावधीत जास्त पावसाचे दर वर्षी उच्चांक गाठले जात आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्याममध्ये जूनच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर संपत आला तरी पाऊस सुरू होता. दोन पावसांमधील अंतरही वाढले आहे. अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसाच्या घटनामध्ये ३० टक्क्यांनी वाढल्याचे संशोधन अहवाल सांगत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला अथवा मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान पडणारा वादळी पाऊस सध्या प्रशासकीय यंत्रणेला सळो की पळो करतो.
हिवाळ्यातही हीच परिस्थिती आहे. पूर्वी पुण्यात रात्री कडाक्याची थंडी होतीच, शिवाय दिवसभर स्वेटर घालून फिरावे लागत असे. आता दिवसभर स्वेटर घालून बसावे लागत नाही. पुण्यात दोन वर्षांपूर्वी (२०२४) थंडीचा कडाका जाणवलाच नाही. या उलट यंदा कडाक्याची थंडी होती. अनेक वर्षांनी थंडीच्या लाटाही अधिक नोंदवल्या गेल्या; पण दिवसाची थंडी यंदाही कमी होती. दुपारी रस्त्यावरून फिरताना ऊन जाणवले. किमान आणि कमाल तापमानातील तफावत अधिक होती. हिवाळा यंदा चर्चेत आळा तो हवेच्या खालवलेल्या गुणवत्तेमुळे. दिल्लीप्रमाणे पुण्यात नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीत संध्याकाळनंतर धुके आणि धूर यांच्या मिश्रणामुळे धुरके बघायला मिळाले. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे सर्दी-खोकला- डोकेदुखीने पुणेकर हैराण झाले होते. शहरातील काही भागात हवेची गुणवत्ता महिनाभर वाईट; तर काही ठिकाणी अतिवाईटही नोंदवली गेली. जानेवारीत थंडीचा जोर ओसरला आणि फेब्रुवारीपासूनच सूर्याने डोके वर काढले. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही महिने या वर्षी तापदायक ठरले आहेत.
मध्यवर्ती पुण्यापेक्षा काचेच्या आणि काँक्रिटची जंगले झालेल्या उपनगरांमधील तापमानामध्ये मोठी तफावत दिसते आहे. चकाचक रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, काँक्रिटचे पार्किंगसाठी विकसकांनी जमिनीत पाणी मुरण्याच्या सर्व जागा या उपनगरांमध्ये बंद केल्या आहेत. बांधकामादरम्यान त्यांनी भूमिगत नैसर्गिक झरे बुजवले आहेत. दुसऱ्या बाजूला बेसुमार जलउपसा सुरू असल्याने भूजलसाठा आटला आहे. त्यात अनियंत्रित वाहतुकीमुळे घातक वायूंच्या बेसुमार उत्सर्जनामुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. दिवसभर तापलेली जमीन थंडच होत नाही. ही वातावरणात उष्णता टिकून राहत असल्याने शहरातील उष्णतेची बेटे (अर्बन हीट आयलंड) विस्तारत असल्याचा निष्कर्ष हवामानतज्ज्ञांनी काढला आहे. दहा वर्षांत पुण्यातील उष्णतेच्या लाटांची संख्याही वाढली असून, लाटांचा कालावधी, त्यात होणाऱ्या तापमानातही वाढ चिंताजनक आहे.
प्रशासकीय यंत्रणांनी पुण्याचे आरोग्य सांभाळणाऱ्या, नैसर्गिक समतोल साधणाऱ्या पर्यावरणाकडे गेल्या दोन वर्षांत साफ दुर्लक्ष केले आहेत. त्याचे दुष्परिणाम आता आपण भोगत आहोत. जागतिक पातळीवरील हवामानातील बदल आणि त्यास पोषक अशी स्थानिक पातळीवरील तापमान वाढीचा फटका पुण्याला बसतो आहे. शहरातील वाढत्या पुराच्या घटना, अतिवृष्टी, शहराच्या एकाच भागात ढगफुटी; तर दुसऱ्या भागात हलका पाऊस, काही ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे तर काही भागांत तो ३५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली... या टोकाच्या घटनांमागे मानवनिर्मिती कारणे आहेत.
एकूच काय तर, हवामानातील बदल या पुण्यासमोरील नव्या संकटाचे गांभीर्य प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी समजून घेण्याची वेळ आली आहे. पावसाळा जवळ आला की आम्ही नाले-ओढे सफाईची कामे सुरू करतो या स्पष्टीकरणाची वेळ गेली. चार दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. अवघ्या दोन तासांत साठ-सत्तर मिलिमीटर पडलेल्या पाऊन पुणे ‘अर्बन फ्लडिंग’चे ( शहरी पूर ) केंद्र झाल्याचे अधोरेखित केले. हा केवळ निसर्गाचा कोप नसून गेल्या दोन दशकांत विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या गळ्याला नख लावण्याच्या आपल्या प्रवृत्तीचा हा परिपाक आहे.
शहरातील तापमान वाढ रोखण्यामध्ये वृक्षाच्छादनाचा मोठा वाटा असतो. पुण्यासाठी शहरातील टेकड्या, वृक्षाच्छादित प्रदेश फुफ्फुसांप्रमाणे काम करतात. टेकड्या, उतारालगतच्या रिकाम्या जागा या नैसर्गिक स्पंज असतात. पावसाचे पाणी साठवून भूमिगत झरे, ओहोळ, ओढे-नाले भूजल साठ्याची जबाबदारी सांभाळतात. गेल्या पंचवीसएक वर्षांत टेकड्यांकडे दुर्लक्ष झाले आहेच, शिवाय उतारांवर झालेल्या बांधकामांनी नैसर्गिक स्पंज नष्ट केले आहेत. पावसाचे पाणी जमीनीत मुरण्याऐवजी उतारांवरील काँक्रिटच्या रस्त्यांवरून वेगाने सखल भागात येते, त्यामुळे अचानक पूर येतात.
शहरातील पूर्वीच्या सरकारी नकाशांवर दिसणारे शेकडो छोटे झरे, ओहोळांचे मार्ग, ओढे आणि नाले कागदांवरून आणि प्रत्यक्ष जागेवरूनही गायब झाले आहेत. अनेक ओढ्यांना पाइपमध्ये बंदिस्त करून त्यावर सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. नैसर्गिकरीत्या पाण्याचा निचरा करण्याचे मार्गच आपण बंद केला आहे. पुणे महापालिकेने ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाइनसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही ठिकठिकाणी पाणी साठते आहे. आंबील ओढ्याच्या पुराचा फटका अनुभवल्यानंतही शहरातील ओढ्या-नाल्यांमध्ये आजही सर्रास राडारोडा आणि कचरा फेकला जातो. वर्षभर कचरा टाकयचा आणि पावसाळ्यापूर्वी तोच पुन्हा काढण्यासाठी पैसे खर्च करायचे, हा अजब कारभार सुरू आहे.
समस्यांची यादी न संपणारी आहे, त्या तुलनेत त्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या ठोस, परिणामकारक कामांची यादी तुटपुंजी आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे. शहरातील वृक्षाच्छादन वाढविणे, वायू प्रदूषणास जबाबदार घटकांवर नियंत्रण ठेवणे, भूजल आणि जमिनीवरील जलस्रोतांचे नियोजन करणे, चीन आणि इतर देशांप्रमाणे पुण्यातही ‘स्पंज सिटी’ संकल्पना राबवणे गरजेचे आहे. टेकड्यांच्या सीमांकनाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून तिथे कोणतेही बांधकाम होणार नाही याची काळजी घेणे. नदी, ओढे, नाल्यांचा श्वास मोकळा करायला हवा. या जलस्रोतांमध्ये टाकलेला राडारोडा काढून तिची वहनक्षमता वाढविण्यासाठी तत्काळ पावले उचलायला हवीत. पर्यावरणीय संतुलनाला प्राधान्य दिले नाही, तर भविष्यात शहरातील आर्थिक नुकसानामागचा सर्वात मोठा वाटा या मानवनिर्मित आपत्तींचा असेल. विकास विनाशाच्या पायावर नसावा, तर तो पर्यावरणाशी सुसंगत असायला हवा. पुणेकरांना आता केवळ ‘स्मार्ट’ नव्हे, तर ‘रेझिलियंट’ (संकटाचा सामना करण्यास सक्षम) शहराची गरज आहे.




