‘राजकीय व्यवस्थेनेपोसले भोंदूबाबांचे पीक’

महाराष्ट्र टाइम्स

राजकीय व्यवस्थेने भोंदूबाबांना प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्रात प्रबोधनाची गरज आहे. खरात प्रकरण हे याला दुजोरा देते. केवळ कायदे पुरेसे नाहीत, समाजानेही जागरूक राहिले पाहिजे. सरकार आणि प्रशासन अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत उदासीन आहे. महिलांचे शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी तातडीने कायद्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महिलांनी अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.

crops of fake babas darkening the tradition of great personalities

‘राज्यातील गावोगावचे भोंदूबाबांचे पीक राजकीय व्यवस्थेने आपल्या हितासाठी पोसले आहे. महापुरुषांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात खरात प्रकरण घडणे हे प्रबोधनाच्या परंपरेला काळीमा फासणारे आहे. या राज्याला अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढून प्रबोधनाचा मार्ग अवलंबला पाहिजे,’ असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

शिवप्रेमी, ‘डोंगरे प्रतिष्ठान’तर्फे शनिवारी ‘प्रबोधन सभे’चे आयोजन करण्यात आले होते. माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या सभेवेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं., ॲड. प्रार्थना सदावर्ते, ॲड. असीम सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ॲड. रूपाली ठोंबरे पाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख, डोंगरे प्रतिष्ठानचे प्रमुख मारुती डोंंगरे उपस्थित होते.

‘सत्याची शपथ घेऊनही राज्यघटनेला अपेक्षित वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारणारे राजकारणी गद्दार आहेत,’ असे सबनीस म्हणाले. ‘भोंदूगिरीविरोधात केवळ कायदे करणे पुरेसे ठरणार नाही. त्याविषयी समाजानेही जागरुक असले पाहिजे. खरात प्रकरणात सरकार त्यांची जबाबदारी पार पाडत नसून, कायद्याचा प्रभाव नष्ट करण्यात सरकारचा सहभाग असल्याचे दिसते,’ अशी टीका सरोदे यांनी केली. हे प्रकरण विशेष न्यायालयात चालणे गरजेचे आहे, असे सरोदे यांनी अधोरेखित केले.

‘जादूटोणाविरोधी कायदा झाला असला, तरी त्याअंतर्गत होणाऱ्या कारवाईबाबत सरकार आणि प्रशासन उदासीन आहे,’ अशी टीका देशमुख यांनी केली.

समाजात स्त्री- पुरुष समता येणे गरजेचे असून, महिलांचे शोषण करणारी व्यवस्था बदलायला हवी. महिलांनीही जागरुक राहणे गरजेचे आहे. यासह महिलांसाठी तातडीने कायद्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे असून, महिलांनी अन्यायाविरोधात एकत्र आले पाहिजे, याकडे प्रबोधन सभेत लक्ष वेधण्यात आले.