‘महापुरुषांची जयंती‘डीजे’मुक्त व्हावी’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजेशिवाय साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वेदपाठशाळेत गणेश पुराणावर प्रवचनाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे आणि तबला वादक अविनाश पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम लवकरच होणार आहेत.

‘महापुरुषांची जयंती‘डीजे’मुक्त व्हावी’

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी उत्साहात साजरी होते. सण, समारंभ, महापुरुषांची जयंती ‘डीजे’वर गाणी लावून साजरी करण्याची पद्धत रुढ होत असून, याला डॉ. आंबेडकर जयंतीही अपवाद ठरत नाही; परंतु डीजेचे दुष्परिणाम मानवी आरोग्यासह प्राण्यांवरही गंभीर परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही डीजेचा वापर न करता साजरी करावी, असे आवाहन ‘कॅटलिस्ट फाउंडेशन’तर्फे सुनील माने यांनी केले आहे.

प्रवचनांचे आयोजन

पुणे : वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेतर्फे वेदभवनातील श्री सिद्धिविनायकाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि श्री गणेश पुराणावर प्रवचनाचे आयोजन आजपासून (दि. ५) १० एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता श्री सिद्धीविनायकाला ऋग्वेद संहितेचा महाभिषेक आणि महापूजा होणार आहे. १० एप्रिलला श्री सिद्धिविनायकास गणेश सहस्रनामाने रक्तपुष्पार्चन आणि महाआरती करण्यात येणार असून, रोज सायंकाळी पाच वाजता प्रवचनकार पं. प्रणव गोखले यांचे गणेश पुराणावर प्रवचन होणार आहे, अशी माहिती वेदभवनचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसास यांनी दिली.

रणदिवे यांना पुरस्कार

पुणे : ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांना सुदामदादा नामदेव कराळे स्मरणार्थ ‘गझलपुष्प जीवन गौरव पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला. १२ एप्रिल रोजी (रविवारी) निगडी येथील सिटीप्राइड स्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर, उद्योजक सुनील कराळे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पांडुरंग भोसले उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘गझलसंध्या’ हा मराठी गझल कार्यक्रम सादर होणार आहे.

पाटील यांना पुरस्कार

पुणे : आर्ट बिट्स फाउंडेशनतर्फे संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तबला वादक अविनाश पाटील यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर झाला. संस्थेचे हे २५वे वर्ष आहे. पं. प्रमोद पाटील आणि पं. उमेश मोघे यांचे शिष्य असणाऱ्या पाटील यांनी देशभरासह परदेशातील विद्यार्थ्यांना तबला वादनाचे प्रशिक्षण दिले आहे.