ण्याची ओळख शिक्षणनगरी, आयटी हब आणि सांस्कृतिक राजधानी अशी असली, तरी सध्या या शहरासमोर उभी राहिलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे वाढती वाहनसंख्या. गेल्या काही वर्षांत विशेषतः करोनानंतर, वाहन खरेदीचा वेग प्रचंड वाढला असून, आता ही वाढ शहरासाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. ही समस्या निर्माण होण्यामागे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष आणि राजकीय अनास्था असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात गेल्या आर्थिक वर्षातच वाहन खरेदीचा आकडा साडेतीन लाखांच्या पुढे गेला आहे, तर एकूण वाहनसंख्या ४३ लाखांच्या वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वा दोन लाख किंवा बारामती परिसरात ५० हजार वाहनांची खरेदी गेल्या वर्षात झाली आहे. पुणे महानगर प्रदेशातील वाहनसंख्या ७५ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये दुचाकीबरोबरच चारचाकी वाहन खरेदीचा वेग खूप वाढत असल्याचे दिसत आहे.
करोनानंतर वाढलेली खरेदी
करोनाकाळात वाहन खरेदीत लक्षणीय घट झाली होती. लॉकडाउन, आर्थिक अनिश्चितता आणि हालचालींवरील निर्बंध यामुळे नागरिकांची वाहन खरेदी कमी झाली होती. मात्र, करोनानंतर परिस्थिती बदलली. सार्वजनिक वाहतुकीबद्दल निर्माण झालेली भीती, वैयक्तिक सुरक्षिततेची गरज आणि बँकांकडून मिळणारी सुलभ कर्जे यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खासगी वाहन खरेदीकडे मोर्चा वळवला. यात दुचाकींबरोबरच चारचाकी खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढले. आज पुण्यात जवळपास ३० लाख दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. कमी खर्च, सोयीस्कर प्रवास यामुळे दुचाकी हा नागरिकांचा पहिला पर्याय ठरत आहे; तसेच अलीकडे सुरक्षित प्रवास आणि स्टेटस जपण्यासाठी कार खरेदीमध्ये मोठी वाढ होत आहे. वाहनसंख्या वाढत असताना शहरातील रस्त्यांची लांबी आणि क्षमता मात्र जवळपास स्थिर आहे. परिणामी, वाहतूक कोंडी ची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पूर्वी केवळ सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी जाणवणारी कोंडी आता दिवसभर कायम असते. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि उड्डाणपूल हे सतत वाहनांच्या ताणाखाली आहेत.आज परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, पुणे हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पहिल्या पाचमध्ये गणले जाते. ही बाब नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी आहे. वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय, इंधनाचा वाढता खर्च आणि मानसिक ताण या समस्या उभ्या राहिल्या आहेत.
सार्वजनिक वाहतूक का अपयशी?
शहरातील वाढत्या वाहनसंख्येमागे सर्वात मोठे कारण म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अपुरी क्षमता. पुण्यातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) गेल्या दशकभरात फारशी सक्षम झालेली नाही. दहा वर्षांपूर्वी पीएमपीची प्रवासी संख्या सुमारे दहा लाखांच्या आसपास होती. आजही ती जवळपास तेवढीच आहे. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला, लोकसंख्या लाखोंनी वाढली, नवीन भाग विकसित झाले; पण बससेवा त्या प्रमाणात वाढली नाही. बससंख्या, फेऱ्या आणि मार्ग यामध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः आयटी पार्क, औद्योगिक क्षेत्रे आणि नव्याने विकसित झालेल्या उपनगरांमध्ये सार्वजनिक वाहतूक अपुरी असल्याने दुचाकी आणि कारचा वापर वाढत आहे. पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय व्यक्तींनी पीएमपीला सक्षम करण्यासाठी विशेष कधीच लक्ष दिले नाही. लोकसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात पीएमपीला बस उपलब्ध करून देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणारे बीआरटीसारखे प्रकल्प वाढवण्याऐवजी ते काढण्यासाठी राजकीय नेते अग्रेसर होते. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या भोवऱ्यात अडकात चाचले आहेत.
मेट्रो विस्तार धीम्या गतीने
पुण्यात मेट्रो प्रकल्पाचा विस्तार सुरू असून, तो शहराच्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून पाहिला जात आहे. ‘महामेट्रो’मार्फत उभारण्यात येणारी मेट्रो सेवा भविष्यासाठी महत्त्वाची असली, तरी सध्या तिचा पूर्ण लाभ नागरिकांना मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे फीडर सेवेचा अभाव. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना बस, शेअर वाहन किंवा सायकल यांसारखे पर्याय सहज उपलब्ध नाहीत. परिणामी, अनेक जण मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी दुचाकी वापरतात. त्यामुळे मेट्रो असूनही रस्त्यांवरील वाहनसंख्या कमी होत नाही. मेट्रोचा विस्तार वेगाने होणे आवश्यक होते; पण तसे होताना दिसत नाही. प्रकल्प मंजूर होऊन वर्ष झाले तरी त्याची कामे वेळेवर सुरू होत नाहीत. सुरू असलेले प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे पुण्यात नागरिकांना खासगी वाहनांकडे वळण्याशिवाय पर्याय राहत नाही. वाहनसंख्या वाढल्यामुळे वायुप्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होत आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे शहराच्या हवेची गुणवत्ता खालावत आहेत. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अलिकडे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असला, तरी त्याचा प्रमाण अजूनही एकूण वाहनसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न अद्याप गंभीरच आहे.
पुण्यातील वाहनसंख्या एवढ्या वेगाने वाढत आहे. आता वाहन क्रमांकांची इंग्रजी सीरीजही संपत आली आहे. तीन अक्षरी सीरीज सुरू करण्याची वेळ येणे हे शहराच्या नियोजनातील मर्यादा दर्शवते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे अत्यावश्यक आहे. पीएमपी बससेवा वाढवणे, नवीन मार्ग सुरू करणे आणि वेळेवर सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मेट्रोसाठी प्रभावी फीडर सेवा उभारणे, सायकल ट्रॅक विकसित करणे आणि पादचारी सुविधांवर भर देणे आवश्यक आहे; तसेच कारपूलिंग, शेअर रिक्षा आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणेही महत्त्वाचे ठरेल. पुण्यातील वाढती वाहनसंख्या ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर शहराच्या भविष्यासाठी मोठा इशारा आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर पुण्याची अवस्था मोठ्या महानगरांसारखी बिकट होण्यास वेळ लागणार नाही. राजकीय इच्छाशक्ती, प्रभावी नियोजन आणि नागरिकांचा सहभाग याच्या माध्यमातूनच या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल; अन्यथा वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यांचा विळखा आणखी घट्ट होत जाणार हे निश्चित !





