कौटुंबिक वादातून आईने एका मुलीला घरातच मारण्याचा प्रयत्न करून, मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत मुलीसह आईचा जीव वाचला असून, विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शुक्रवारी (तीन एप्रिल) घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
निहांत आशिष बाणखेले (वय सहा) असे मृत मुलाचे नाव असून, परीज्ञा आशिष बाणखेले (वय १३) हिच्यासह तिची आई हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५, रा. मंचर, ता. आंबेगाव) या वाचल्या आहेत. या प्रकरणी पती आशिष बाणखेले यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३०च्या सुमारास मंचर येथील लालबाग प्रेस्टीज येथे प्रॉपर्टीच्या कौटुंबिक कारणावरून सुरू असलेल्या वादातून संतापाच्या भरात आईने १३ वर्षीय मुलगी परीज्ञावर घरातच जीवघेणा हल्ला केला. गळा आवळून व मारहाण करून ती मृत झाल्याचे समजून तिला घरातच बंद करून ठेवले. त्यानंतर निहांत याला दुचाकीवर सोबत घेऊन ती तपनेश्वर मंदिराजवळील विहिरीकडे गेली. तिथे मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. हर्षदा यांना विहिरीत उडी मारताना नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी दोघांना बाहेर काढले. मात्र, निहांतचा मृत्यू झाला होता. हर्षदा जखमी झाल्या आहेत. घरातच मुलगी परीज्ञा गंभीर जखमी अवस्थेत सापडली.





