शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स

एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्वशांती गुरुकुल शाळेने केलेल्या शुल्कवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आंदोलन केले. पालकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षांत शुल्कात मोठी वाढ झाली असून, मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण येत आहे. शाळेतील सुविधा अपेक्षेप्रमाणे नसल्याचा आरोपही करण्यात आला. पालकांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

mass protest against the fee hike increasing economic pressure on middle class families

शाळेची प्रस्तावित शुल्कवाढ ही नियमानुसार केली आहे. या शुल्कवाढीच्या संबंधित माहिती पालक आणि पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन, त्यांना सविस्तर दिली आहे, असे स्पष्टीकरण एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्वशांती गुरुकुल शाळेच्या वतीने देण्यात आले.

एमआयटी शिक्षण संस्थेच्या ‘माईर्स विश्वशांती गुरुकुल’ शाळेने अवाजवी शुल्कवाढ केल्याचा आरोप करून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शाळेविरोधात शनिवारी आंदोलन केले. या वेळी पालकांनीही सहभागी होऊन शुल्कवाढीला विरोध दर्शविला. या बेकायदा शुल्कवाढीची तक्रार शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पालकांनी जोरदार घोषणाबाजी करून, प्रशासनाचा निषेध म्हणून बनावट नोटा भिरकावल्या. गेल्या काही वर्षांत शाळेच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. केवळ तीन वर्षांत वार्षिक शैक्षणिक शुल्क ३० ते ३५ टक्क्यांनी वाढवले आहे. विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यास उशीर झाला, तर पालकांना मोठा दंड आकारला जातो. या शुल्कवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे. शुल्कवाढीबाबत स्पष्ट माहिती किंवा पारदर्शकता नसल्याचीही पालकांची तक्रार आहे. शाळेत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि आवश्यक सुविधा अपेक्षेप्रमाणे नसल्याचा आरोप करण्यात आला.

विद्यार्थी आणि पालकांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ‘मनविसे’चे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी केला. पालकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान सहन केले जाणार नाही, असे ‘मनविसे’च्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. या वेळी शशांक अमराळे, नीलेश जोरी, केतन डोंगरे, अशोक पवार यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.